भारतीय संघाचा फलंदाज अजिंक्य रहाणे मागच्या काही काळापासून खराब फाॅर्मशी झगडत आहे. तो सध्या सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसटी मालिकेत काही खास कामगिरी करू शकला नाही. या मालिकेतील ४ सामन्यांतील त्याच्या ८ डावांमध्ये तो फक्त एकदाच अर्धशतक करू शकला आहे. यामुळे संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेवर सतत टीका आणि चाहत्यांकडून त्याला ट्रोल केले जात आहे. अशात भारताचा माजी सलामीवीर वींरेद्र सेहवागने अजिंक्यला खराब फॉर्ममधून बाहेर येण्यासाठी एक सल्ला दिला आहे.
रहाणेचे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ५, १, ६१, १८, १४, ० असे प्रदर्शन राहिले आहे. त्याला या खराब फाॅर्ममधून बाहेर येण्यासाठी सेहवागने असा सल्ला दिला आहे, जो एकेकाळी सचिन तेंडुलकरने त्याला दिला होता.
चौथ्या कसोटी सामन्यदरम्याने सेहवागने त्याला हा सल्ला दिला आहे. तो म्हणाला, “हे प्रत्येक फलंदाजासोबत होते. माझ्यासोबतही असेच झाले होते आणि तेव्हा सचिन तेंडुलकरने मला एक उपाय दिला होता. मी सुद्धा रहाणेला तोच सल्ला देईल. सचिनने मला सांगितले होते की, तू मैदानावर जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न कर. असा विचार कर की तुला तुझे आई वडील मैदानावर खेळताना पाहू इच्छित आहेत. तू त्याच्यासाठी जेवढा वेळ शक्य असेल तेवढा वेळ मैदानावर थांब. तू धावा कर किंवा न कर पण तुझ्या आई वडीलांसाठी मैदानावर थांब. ते तुला तेथा पाहू इच्छितात.”
“रहाणेच्या शैलीमध्येही काही कमी नाहीये. तो खूपच अनुभवी खेळाडू आहे. त्याच्यासोबत संघ व्यवस्थापनाने बोलले पाहिजे आणि विश्वास दिला पाहिजे की, तू कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देऊ नको. फक्त चांगली कामगिरी करण्याविषयी विचार कर,” असेही सेहवाग म्हणाला.
सेहवागने म्हटल्याप्रमाणे भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी रहाणेवर विश्वास दाखवला आहे.
चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रहाणेच्या फलंदाजीविषयी पत्रकार परिषदेत राठोड म्हणाले, “जेव्हा तुम्ही इतके दिवस क्रिकेट खेळता तेव्हा तुमच्याकडे असे टप्पे येतात, जिथे तुम्हाला धावा मिळत नाहीत. त्यामुळे ही एक वेळ असते, जेव्हा एक संघ म्हणून तुम्हाला त्याच्यापाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता असते. आपण पुजाराला अधिक संधी मिळताना पाहिले आणि नंतर तो फॉर्ममध्ये परत आला, त्याने आमच्यासाठी काही महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या. आम्हाला आशा आहे की, अजिंक्य देखील फॉर्ममध्ये परत येईल आणि आपल्याला माहित आहे की तो अजूनही भारतीय संघाच्या फलंदाजीमध्ये प्रमुख भूमिका बजावतो. म्हणून, मला वाटत नाही की हे खूप चिंतेचे कारण आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघाला धक्का! शेवटच्या कसोटीतून रवी शास्त्री बाहेर, मोठे कारण आले समोर
टी२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान संघात मोठा फेरबदल, मुख्य प्रशिक्षक मिसबाहसह गोलंदाजी कोचचाही राजीनामा
भारतीय शिलेदारांच्या ‘सांघिक कामगिरी’मुळे इंग्लंडचा विजयपथ कठीण, नोंदवला अद्भुत विक्रम