इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघात एकमेव कसोटी सामना खेळला जात आहे. हा कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात आयर्लंडने पहिल्या डावात 172 धावा केल्या होत्या. यानंतर इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ऑली पोप याच्या द्विशतक आणि बेन डकेट याच्या 182 धावांच्या जोरावर 4 विकेट्स गमावत 524 धावा केल्या आणि डाव घोषित केला. तसेच, दुसऱ्या डावातही आयर्लंडच्या तीन विकेट्स काढल्या. अशात संघ इंग्लंडच्या पहिल्या डावातील आघाडीमुळे सध्या 255 धावा मागे आहे. तसेच, तिसऱ्या दिवशीच त्यांच्यावर पराभवाचे सावट पसरले आहे. या सामन्यात इंग्लंडच्या पोप आणि डकेट खेळाडूंनी विक्रम रचले आहेत.
ऑली पोप (Ollie Pope) हा इंग्लंडचा सर्वात वेगवान द्विशतक करणारा फलंदाज बनला आहे, तर बेन डकेटने डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडला आहे. विशेष म्हणजे, बेन डकेट (Ben Duckett) याने मोडलेला विक्रम 93 वर्षांपूर्वीचा होता.
FIRST HOME CENTURY!! ????
Pure class, @BenDuckett1 ????#ENGVIRE pic.twitter.com/LiWoj6AxLc
— England Cricket (@englandcricket) June 2, 2023
ऑली पोपने इंग्लंडमध्ये झळकावलं वेगवान द्विशतक
ऑली पोप याने सामन्यादरम्यान कसोटी कारकीर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. पोपने 83व्या षटकात एंडी मॅकब्राईनच्या चेंडूवर षटकार मारत द्विशतक साकारले. त्याने अवघ्या 207 चेंडूंचा सामना करताना ही कामगिरी केली. हे इंग्लंडमधील सर्वात वेगवान द्विशतक आहे. यापूर्वी हा विक्रम इयान बॉथम यांच्या नावावर होता. त्यांनी भारताविरुद्ध 1982मध्ये 220 चेंडूत द्विशतक झळकावले होते. पोपचे हे एकूण सातवे सर्वात वेगवान द्विशतक आहे. त्याने 205 धावा करत तंबूचा रस्ता पकडला.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतके करण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या नेथन एस्टल यांच्या नावावर आहे. त्यांनी 2002मध्ये इंग्लंडविरुद्ध फक्त 153 चेंडूत द्विशतक केले होते. बेन स्टोक्स (163 चेंडू) दुसऱ्या, तर वीरेंद्र सेहवाग (168 चेंडूत) तिसऱ्या स्थानी आहे.
बेन डकेटने डॉन ब्रॅडमन यांचा 93वर्षे जुना विक्रम मोडला
याच सामन्यात बेन डकेट यानेही शानदार फलंदाजी केली. त्याने घरच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळताना 178 चेंडूत 182 धावांची खेळी साकारली. डकेटने लॉर्ड्समध्ये कसोटीत सर्वात वेगवान 150 धावा (150 चेंडूत) करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने ऑस्ट्रेलियाचे दिग्गज सर डॉन ब्रॅडमन (Sir Don Bradman) यांचा 93 वर्षे जुना विक्रम मोडला. ब्रॅडमन यांनी 1930मध्ये लॉर्ड्स मैदानात इंग्लंडविरुद्ध खेळताना 166 चेंडूत 150 धावांची खेळी साकारली होती. केविन पीटरसन याने 2008मध्ये 176 चेंडूत 150 धावा केल्या होत्या. डकेट त्याचे पहिले द्विशतक करण्यास हुकला. त्याला 182 धावांवर असताना ग्राहम ह्यूम याच्या चेंडूवर बाद झाला. (eng vs ire test cricketer ollie pope slams seventh quickest test 200 ben duckett breaks don bradman records know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मन सुन्न करणारी घटना! ओडिसा रेल्वे भीषण अपघातावर व्यक्त झाला विराट; म्हणाला, ‘खूपच दु:ख…’
‘आमच्या देशात यायला प्रत्येक संघ घाबरतोय’, Asia Cupपूर्वी पाकिस्तानच्याच माजी खेळाडूचे खळबळजनक भाष्य