इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंड संघाला पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. उभय संघातील हा सामना २ जून रोजी सुरू झाला होता, पण एक दिवस आधीच सामन्याचा निकाल समोर आला. इंग्लंडने हा सामना ५ विकेट्स राखून जिंकला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने पराभवानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुटचे कौतुक केले.
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील हा पहिला कसोटी सामना ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेळला गेला. पहिल्या डावात गोलंदाजांनी एकहात्ती सत्ता केल्याचे चित्र दिसले. पण दुसऱ्या डावात मात्र फलंदाजांसाठी परिस्थिती काही अंशी चांगली बनली होती. जो रुट (Joe Root) नुकताच काही दिवसांपूर्वी इंग्लंड कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला. असे असले तरी, त्याने फलंदाजाच्या रूपात स्वतःचे चांगेल प्रदर्शन चालूच ठेवले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान रुटने वैयक्तिक १०००० कसोटी धावा पूर्ण केल्या.
रुटने या सामन्यातील पहिल्या डावात ११ धावांवर विकेट गमावली, पण दुसऱ्या डावात मात्र त्याने १७० चेंडूत नाबाद ११५ धावा ठोकल्या. त्याचे हे प्रदर्शन पाहून न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) देखील प्रभावित झाला आहे. रुटच्या कौतुकात सामना संपल्यानंतर विलियम्सन म्हणाला की, “हा एक चांगला सामना होता, एकदम संतुलित. जो रुटची कामगिरी खरोखर अविश्वसनीय आहे. एवढ्या मोठ्या काळापासून या खेळाडूची गुणवत्ता पाहून आपण म्हणू शकतो की, तो विश्वस्तरीय आहे.”
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर सामना खूपच रोमांचक होता. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात न्यूझीलंडचा संपूर्ण संघ अवघ्या १३२ धावांवर गुंडाळला गेला. त्यानंतर इंग्लंडला देखील पहिल्या डावात काही कमाल दाखवता आली नाही. इंग्लंडने अवघ्या १४१ धावांवर सर्व विकेट्स गमावल्या.
त्यानंतर दुसऱ्या डावात मात्र परिस्थिती फलंदाजीसाठी सुधारली. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात २८५ धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. विजयासाठी इंग्लंडला २७७ धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी पाच विकेट्स आणि सामन्याचा एक दिवस शिल्लक असताना गाठले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘ही एक अद्भूत कसोटी, कर्णधारपदाची पर्वा न करता…’, विजयी पताका फडकवल्यानंतर स्टोक्सने मांडल्या भावना
विक्रमवीर ‘राफाʼ..! दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने पटकावले १४वे विक्रमी विजेतेपद