---Advertisement---

जो रूटचा कसोटीमध्ये ऐतिहासिक पराक्रम! सचिन तेंडुलकरनंतर ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला केवळ दुसराच फलंदाज

On: शनिवार, जून 6, 2026 12:47 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. या सामन्यात गोलंदाजांनी फलंदाजांना खेळपट्टीवर अधिक काळ टिकूच दिले नाही. यामुळे एकाही खेळाडूचे शतक झाले नाही, केवळ दोन फलंदाजांनी अर्धशतके केली असून ही दोन्ही अर्धशतके इंग्लंडकडून आली आहेत. त्यांचा अनुभवी फलंदाज जो रूट दोन्ही डावांमध्ये काही खास कामगिरी करू शकला नाही, मात्र तरीही त्याच्या नावावर एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली आहे.

रूट पहिल्या डावात 1 धाव आणि दुसऱ्या डावात 8 धावा करत बाद झाला. यावेळी तो दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आला तेव्हा तो कसोटी क्रिकेटमध्ये 300 डाव खेळणारा इंग्लंडचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी इंग्लंडच्या 149 वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात अशी कामगिरी कोणीही केलेली नव्हती. तसेच तो कसोटीमध्ये 300 डाव खेळणारा जगातील केवळ दुसराच फलंदाज ठरला आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर या यादीत पहिल्या स्थानी आहे.

सचिननंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक डाव खेळणारा रुट दुसराच फलंदाज आहे. मास्टर ब्लास्टरने त्याच्या कसोटी कारकिर्दीत भारतासाठी 329 डाव खेळले आहेत. तर आता रूट 300 डाव पूर्ण करणारा केवळ दुसराच फलंदाज ठरला आहे.

रूटने 164 सामन्यांच्या 300 डावांमध्ये 50.73 च्या सरासरीने 13952 धावा केल्या आहेत. यामध्ये 41 शतके आणि ६६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची कसोटी क्रिकेटमधील सातत्याची कामगिरी पाहता तो सचिनचे चार विक्रम मोडू शकतो. त्यामध्ये कसोटीमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक कसोटी शतके, अर्धशतके आणि सर्वाधिक डावांमध्ये फलंदाज करणे यांचा समावेश आहे.

सचिनने 200 कसोटी सामन्यांच्या 329 डावांमध्ये 53.78 च्या सरासरीने 15921 धावा केल्या आहेत. यामध्ये 51 शतके आणि 68 अर्धशतकांचा समावेश आहे. यामुळे रूट आणि सचिन यांच्या धावांमधील फरक केवळ 1969 आहे. तसेच सचिनच्या सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडण्यासाठी रूटला 10 शतकांची आवश्यकता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---