पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं आपला डाव 823/7 धावांवर घोषित केला. यासह इंग्लंडनं पहिल्या डावात 267 धावांची आघाडी घेतली आहे. शफीक, मसूद आणि आगा यांच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्ताननं पहिल्या डावात 556 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, हॅरी ब्रूक (317) आणि जो रुट (262) यांच्या विक्रमी खेळीमुळे इंग्लंडला 800 हून अधिक धावा करता आल्या. या काळात पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. आता त्यांच्या नावे एक नकोसा रेकॉर्ड नोंदल्या गेला आहे.
इंग्लंडच्या डावात पाकिस्ताननं एकूण सात गोलंदाजांचा वापर केला आणि या सातही गोलंदाजांनी 100 पेक्षा जास्त धावा दिल्या. अबरार अहमदनं सर्वाधिक षटकं टाकली आणि सर्वाधिक धावा दिल्या. त्यानं 35 षटकात 174 धावा दिल्या. तो खराब तब्बेतीमुळे चौथ्या दिवशी खेळला नाही.
यापूर्वी झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात कसोटी डावात 6 गोलंदाजांनी 100 हून अधिक धावा दिल्या होत्या. 2004 मध्ये खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेच्या 6 गोलंदाजांनी 100 हून अधिक धावा दिल्या होत्या. या सामन्यातही झिम्बाब्वेनं सात गोलंदाजांचा वापर केला होता.
जो रुट आणि हॅरी ब्रूकच्या दमदार खेळीच्या जोरावर इंग्लंडनं पहिल्या डावात 823 धावांवर डाव घोषित केला. आघा सलमाननं 137व्या षटकात जो रुटला पायचीत केलं. त्यानं 375 चेंडूत 17 चौकार मारत 262 धावा केल्या. हॅरी ब्रूकनं आपल्या 317 धावांच्या नाबाद खेळीत 29 चौकार आणि 3 षटकार ठोकले. क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडच्या दोन फलंदाजांनी एकाच डावात द्विशतक ठोकण्याचा पराक्रम करण्याची ही दुसरी वेळ आहे.
हेही वाचा –
4 वर्षांत खोऱ्यानं धावा केल्या, तरीही रुट कोहलीचा हा रेकॉर्ड मोडू शकला नाही!
एका सुवर्ण युगाचा अंत! महान टेनिसपटू राफेल नदालची निवृत्तीची घोषणा
घरच्या मैदानावर पाकिस्तानची नाचक्की! इतक्या वर्षांनंतर कसोटीत बनल्या 800 पेक्षा अधिक धावा