इंग्लंड आणि श्रीलंका या संघांमध्ये तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा टी-२० सामना गुरुवारी (२४ जून) कार्डिफ येथे पार पडला. या सामन्यात देखील यजमान इंग्लंड संघाने पाहुण्या श्रीलंकन संघाला पराभूत करत मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे.
कार्डिफच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात श्रीलंकन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु इंग्लंडच्या गोलंदाजांनी हा निर्णय पुर्णपणे चुकीचा ठरवला. कारण संघाची धावसंख्या १८ असताना श्रीलंकन संघातील सलामी फलंदाज पवेलियनमध्ये परतले होते. सर्वात आधी दमुष्का गुणतिलाका ३ धावा करत माघारी परतला. त्यानंतर अविष्का फर्नांडो ६ धावा करत बाद झाला होता.
श्रीलंकन संघाकडून कुसल मेंडिसने सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली होती. यामध्ये त्याने ३ चौकार आणि १ षटकार लगावला होता. तसेच इसुरू उडाणाने शेवटी येऊन १९ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर श्रीलंकन संघाला २० षटकअखेर ७ बाद १११ धावा करण्यात यश आले होते. (Eng vs SL 2d T20: England beat srilnaka by 5 wickets)
इंग्लंड संघाला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी २० षटकात अवघ्या ११२ धावांची आवश्यकता होती. परंतु पावसाचे आगमन झाल्यामुळे इंग्लंड संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार, १८ षटकात १०८ धावांचे आव्हान मिळाले होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना, इंग्लंड संघातील सलामी फलंदाज देखील लवकर माघारी परतले होते. जेसन रॉयने १७ धावांचे योगदान दिले तर, जॉनी बेअरस्टो खातेही न उघडता माघारी परतला होता. लियाम लिविंगस्टोने २९ धावांची खेळी केली आणि सॅम बिलिंग्सने २४ धावांचे योगदान दिले. शेवटी सॅम करणने नाबाद १६ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर इंग्लंड संघाने १६.१ षटकात आव्हान पूर्ण करत ५ गडी राखून विजय मिळवला. या मालिकेतील तिसरा टी-२० सामना शनिवारी (२६ जून) खेळवण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘त्याचे’ सलामीला फलंदाजी करण्याचे दिवस संपले; माजी खेळाडूची भारतीय क्रिकेटरबद्दल मोठी प्रतिक्रिया
कसोटी चँपियनशीप पराभवाच्या जखमेनंतर टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू दुखापतग्रस्त