दीडशे वर्षांपेक्षा जास्त असलेल्या क्रिकेट इतिहासात अनेक अविस्मरणीय सामने खेळले गेले आहेत. दुर्दैव म्हणजे या सामन्यांबद्दल अनेकांना पुरेशी माहिती नसते. आज आपण या लेखात क्रिकेट इतिहासातील असाच एक अविस्मरणीय सामन्याबद्दल जाणून घेणार आहोत, जो खेळला गेला होता इंग्लंड व ऑस्ट्रेलिया संघांमध्ये.
इंग्लंडचा संघ दोन कसोटी सामन्यासाठी 1887 साली ऑस्ट्रेलियामध्ये गेला होता. या दौऱ्यातील पहिला सामना सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे खेळला गेला. सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा ऑस्ट्रेलियाचा डाव पूर्णपणे यशस्वी ठरला. त्यांनी पहिल्या डावात इंग्लंडचा संपूर्ण संघ केवळ 45 धावांवर बाद करण्यात यश मिळवले. ऑस्ट्रेलियाकडून या सामन्यात पदार्पण करणाऱ्या चार्ली टर्नरने 6 तर जेजे फेरिसने 4 बळी मिळवले.
इंग्लंडला कमी धावसंख्येत रोखणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव देखील 119 धावांवरच आटोपला. पहिल्या डावानंतर ऑस्ट्रेलियाकडे 74 धावांची आघाडी होती. इंग्लंडकडून डिक बार्लो आणि जॉर्ज लोहमन यांनी प्रत्येकी 3 बळी मिळवले.
आपल्या दूसऱ्या डावात इंग्लंडने काहीशा सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. इंग्लंडने दुसऱ्या डावात 184 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 111 धावांचे लक्ष्य ठेवले. 111 धावांच्या पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 97 धावांवर गडगडला व इंग्लंडने ऐतिहासिक पुनरागमन करत सामना 14 धावांनी जिंकला.
त्या डावात इंग्लंडकडून बिली बार्ने या गोलंदाजाने कमाल केली होती. त्याने 46 षटके गोलंदाजी करताना 29 षटके निर्धाव टाकली होती. तसेच केवळ 28 धावा देत 6 विकेट्स मिळवल्या होत्या. तर जॉर्ज लोहमनने 3 विकेट्स घेतल्या होत्या. तर जॉनी ब्रिग्सने 1 विकेट घेण्यात यश मिळवले होते. यांच्याशिवाय अन्य गोलंदाजांनीही विकेट घेतल्या नसल्या तरी धावांवर अंकुश ठेवला होता. त्यामुळे इंग्लंडला हा सामना जिंकता आला होता.
पहिल्या दिवशीच्या खेळानंतर सामन्यातून पूर्णतः बाहेर असलेल्या इंग्लंडने जबरदस्त पुनरागमन करत ऐतिहासिक विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हरियाणा हरिकेन’ कपिल देव यांनी आजच्याच दिवशी केला होता कसोटीतील ‘मोठा’ विश्वविक्रम
‘आठव्या क्रमांकावर फलंदाजी थोडी लवकर होईल, मला ११ नंबरला ठेवा’; जडेजाचे ट्वीट का आहे चर्चेत?
हेही पाहा-