इंग्लंडचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सनं जूनमध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषकातून माघार घेतली आहे. त्यानं इंग्लंडच्या मॅनेजमेंटला सांगितलं की, अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी त्याच्या नावाच विचार केला जाऊ नये.
बेन स्टोक्स इंग्लंडच्या 2022 टी-20 विश्वचषक विजयाचा हीरो आहे. त्यानं पाकिस्तानविरुद्ध फायनलमध्ये अर्धशतक झळकावत विजयी धाव घेतली होती. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडनं पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला होता. मात्र तेव्हापासून स्टोक्सनं फक्त दोन टी20 सामने खेळले आहेत. हे दोन्ही सामने त्यानं आयपीएलमध्ये खेळले आहेत.
बेन स्टोक्सनं 2022 मध्ये अचानक एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषकात खेळण्यासाठी त्यानं आपला निर्णय मागे घेतला. यासाठी त्यानं आपली गुडघ्याची शस्त्रक्रिया लांबवली होती. अलीकडेच भारताविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत तो फक्त पाच षटकं गोलंदाजी करू शकला होता. त्यानं आयपीएल 2024 मधूनही माघार घेतली आहे. आता पुढील काही महिने तो कौंटी चॅम्पियनशिपमध्ये डरहॅमकडून खेळण्याची अपेक्षा आहे.
स्टोक्सच्या अनुपस्थितीत, इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानावर लियाम लिव्हिंगस्टोनला खेळवू शकतो. मात्र लिव्हिंगस्टोन रविवारी पंजाब किंग्जसाठी क्षेत्ररक्षण करताना जायबंदी झाला. त्याच्या पायाचे स्नायूं ताणले गेले आहेत. त्याच्या पायांचं स्कॅनिंग करण्यात आलं असून अद्याप परिणाम आलेले नाहीत. जर लिव्हिंगस्टोन दुखापतीमुळे अनुपलब्ध असेल तर सरेचा अष्टपैलू खेळाडू जेमी ओव्हरटनला टीममध्ये संधी मिळू शकते.
बेन स्टोक्सच्या टी20 कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, या अष्टपैलू खेळाडूनं 43 सामन्यांच्या 36 डावांमध्ये 585 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 21.67 आणि स्ट्राईक रेट 128.01 एवढा राहिला. याशिवाय त्यानं गोलंदाजी करताना 8.39 च्या इकॉनॉमीनं 26 बळीही घेतले आहेत.
स्टोक्सनं गेल्या तीन वर्षांत विश्वचषका व्यतिरिक्त इंग्लंडसाठी फक्त तीन टी 20 सामने खेळले आहेत. या निर्णयामुळे त्याची टी20 आतंरराष्ट्रीय कारकीर्द जवळपास संपुष्टात आली, असंच म्हणावं लागेल. मात्र तो अजूनही 2026 मध्ये भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी 20 विश्वचषकात खेळू शकतो. तेव्हा त्याचं वय फक्त 34 वर्ष असेल!
महत्त्वाच्या बातम्या-
वानखेडेवर रियान परागचं वादळ! मुंबईची पराभवाची हॅट्रिक, राजस्थानचा सलग तिसरा विजय
आयपीएलच्या चीअरलीडर्सचा पगार किती असतो? एका सामन्यासाठी किती मानधन मिळतं? जाणून घ्या
जोस बटलरनं आपलं नाव बदललं, इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून अधिकृत घोषणा