प्रतिष्ठेची कसोटी मालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेतील अखेरचा सामना सोमवारी (31 जुलै) समाप्त झाला. ओव्हल येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंड संघाने अखेरच्या सत्रात शानदार पुनरागमन करत, 49 धावांनी विजय साजरा केला. यासह पाच सामन्यांची मालिका 2-2 अशा बरोबरीत समाप्त झाली. असे असतानाच या पाचव्या कसोटीत एक नवा विक्रम नोंदवला गेला.
ओव्हल येथे झालेल्या या सामन्यात चारही डावात मोठी धावसंख्या पाहायला मिळाली. या सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना हॅरी ब्रूक याच्या अर्धशतकाच्या तसेच इतर फलंदाजांच्या योगदानामुळे 284 धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने स्मिथच्या शानदार अर्धशतकासह 295 धावा करत बारा धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. इंग्लंडने दुसऱ्या डावात अत्यंत आक्रमक फटकेबाजी करताना 395 धावा केल्या. यामध्ये झॅक क्राऊली, जो रूट व बेअरस्टो यांच्या अर्धशतकांचा समावेश होता. पूर्ण दोन दिवसात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 384 धावा करायचे होत्या. अनुभवी स्मिथ, वॉर्नर व ख्वाजा यांनी अर्धशतके केल्यानंतरही इतर फलंदाजांनी खराब कामगिरी केल्यामुळे ऑस्ट्रेलियाला 49 धावांनी पराभूत व्हावे लागले.
या संपूर्ण सामन्यात दोन्ही संघाच्या एकही फलंदाजाला शतक करता आले नाही. असे असताना देखील या सामन्यात तब्बल 1307 धावा बनल्या. एकाच कसोटी सामन्यात एकही शतक न बनता सर्वाधिक धावा बनवण्याचा हा विश्वविक्रम आहे. यापूर्वी कसोटी सामन्यात शतक न होता सर्वाधिक धावा होण्याचा विश्वविक्रम इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी केला होता. तब्बल 95 वर्षांपूर्वी 1928 मध्ये डर्बन येथे झालेल्या सामन्यात 1272 धावा निघालेल्या.
(England And Australia Broke 95 Years Old Record In Oval Test)
महत्त्वाच्या बातम्या-
लग्नाच्या 1 महिन्यातच बदललं नशीब; वेगवान गोलंदाजाचे एक वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन
रिंकूचे नशीब फळफळले! 18 दिवसात 2 वेळा मिळाली टीम इंडियात जागा; म्हणाला, ‘दररोज 6 तास…’