मुंबई । ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ इंग्लंड दौर्यावर जाणार आहे. या दौर्यावर जैविक वातावरणामध्ये तीन टी 20 आणि तीन वनडे सामन्यांची आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहेत. या दौऱ्याचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा दौरा 4 सप्टेंबरपासून सुरू होईल.
इंग्लंडमध्ये याच महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात कसोटी मालिका खेळली जात असून त्यानंतर इंग्लंड संघ पाकिस्तान बरोबर दोन हात करेल. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ इंग्लंड दौऱ्यावर येणार आहे.
‘द डेली टेलीग्राफ’ च्या अहवालानुसार टी 20 मालिकेपासून या दौऱ्यास प्रारंभ होईल. टी -20 सामने 4, 6 आणि 8 सप्टेंबरला खेळविण्यात येतील. 10, 12 आणि 15 सप्टेंबर रोजी वनडे सामने होतील.
ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडला एका विशेष विमानाने रवाना होईल. सर्व सहा सामने साऊथॅम्प्टन आणि मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळण्याची शक्यता आहे. या दोन्ही ठिकाणी स्टेडियमलगत हॉटेल असून संघ, सामनाधिकारी आणि ब्रॉडकास्टर्सना राहण्यासाठी सोपे होणार आहे.
इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात सध्या या दोन्ही मैदानांवर कसोटी मालिका खेळवली जात आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनही झाले. यानंतर या ठिकाणी पाकिस्तानविरूद्धची मालिकादेखील खेळवली जाईल. ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने मागील आठवड्यात या दौऱ्यासाठी 26 सदस्यीय संभाव्य संघाची निवड केली होती.