---Advertisement---

फक्त ४ वनडेचा अनुभव असणाऱ्या इंग्लिश गोलंदाजाने पहिल्या ३ चेंडूत काढल्या २ विकेट्स, पाहा ते क्षण

On: शुक्रवार, जुलै 9, 2021 9:49 AM
---Advertisement---

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पावरप्ले अर्थातच सुरुवातीच्या ५ षटकांत अधिकाधिक धावा काढणे किंवा अधिकाधिक विकेट्स मिळवणे हा संघांचा हेतू असतो. यामुळे संघाला भक्कम सुरुवात मिळते. गुरुवारी (०८ जुलै) इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात कार्डिफ येथे पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडचा २४ वर्षीय वेगवान गोलंदाज शाकिब महमूदने संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. पहिल्या ३ चेंडूवर पाकिस्तानच्या २ मोठ्या फलंदाजांची विकेट चटकावत त्याने सर्वांचे लक्ष वेधले.

इंग्लंडच्या नव्या संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचे ठरवले. केवळ ४ वनडे सामन्यांचा अनुभव असलेल्या महमूदला डावातील पहिलेच षटक देण्याचा धाडसी निर्णय इंग्लंडच्या कर्णधाराने घेतला. महमूदने आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला. पाकिस्तानचा सलामीवीर इमाम-उल-हकने पायाच्या दिशेने येत असलेला पहिला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू त्याच्या बॅटला लागलाच नाही आणि तो शून्यावर पायचित झाला.

त्यानंतर आयसीसीच्या वनडे क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान असलेला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याने सुरुवातीला हलक्या हाताने शॉट मारत मैदानावर सेट होण्याचे ठरवले. त्या अनुषंगाने त्याने आपल्या पहिल्याच चेंडूवर (षटकातील तिसरा चेंडू) साधारण फटका मारला. परंतु झॅक क्राउलेने सोपा झेल पकडत शून्यावर त्याला झेलबाद केले आणि महमूदला डावातील दुसरी विकेट मिळाली.

अशाप्रकारे पहिल्याच षटकातील पहिल्या ३ चेंडूत २ मोठ्या विकेट मिळाल्याने इंग्लंडच्या गोटात आनंदाची लहर पसरली होती. महत्त्वाचे म्हणजे, महमूदचा हा केवळ ५ वा वनडे सामना होता.

त्यानंतर महमूदने पुढेही आपला भेदक मारा चालू ठेवला आणि अजून २ विकेट्सची खात्यात नोंद केली. सातव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर साउद शकील (५ धावा) आणि २६.२ षटकात फहीम अशरफला (५ धावा) बाद करण्याचा पराक्रम त्याने केला. पाकिस्तानच्या डावात १० षटके गोलंदाजी करताना ४२ धावांवर एकूण ४ विकेट्स घेत त्याने पाकिस्तानला १४१ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या फलदाजांनी २१.५ षटकात १ विकेट्स गमावत पाकिस्तानचे आव्हान पूर्ण केले आणि ९ विकेट्सने सामना खिशात घातला.

भेदक गोलंदाजीने इंग्लंडचा विजय निश्चित करणाऱ्या महमूदला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लंडच्या नव्या संघाने पाकिस्तानला चारली धूळ, पहिल्या वनडेत पाहुण्यांचा ९ विकेट्सने दारुण पराभव

संजू सॅमसन नव्हे तर ‘या’ यष्टीरक्षकाने श्रीलंकाविरुद्ध करावे यष्टीरक्षण, माजी खेळाडूची इच्छा

आयसीसीने धोनीसाठी शेअर केलेल्या व्हिडिओवर संगकाराने ‘ही’ प्रतिक्रिया देऊन जिंकले चाहत्यांचे मन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---