अहमदाबाद। नरेंद्र मोदी स्टेडियमवर २४ फेब्रुवारीपासून सुरु झालेला भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दिवस-रात्र कसोटी सामना भारताने १० विकेट्सने जिंकला. हा सामना केवळ २ दिवसात संपला. त्यामुळे अनेकांनी या सामन्यासाठी वापरलेल्या खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. इंग्लंडच्या काही माजी क्रिकेटपटूंनीही या खेळपट्टीवर टीकाही केली. पण असे असतानाच इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटपटूनेच खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांना फटकारले आहे.
इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅमी स्वानने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले आहे की ‘मला आशा आहे की यावेळी इंग्लंड संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये प्रमाणिकपणे चर्चा होईल की त्यांना या सामन्यातून काय गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. त्यांना फक्त खेळपट्टीबद्दल चर्चा करायची आहे का? मला माहित आहे की इंग्लंडमध्ये याबद्दल बरीच चर्चा होत असेल. अनेकजण म्हणत असतील की ‘खेळपट्टी अशी आहे, खेळपट्टी तशी आहे.’ पण खरंतर खेळपट्टी दोन्ही संघांसाठी सारखीच होती.’
स्वान पुढे म्हणाला, ‘इंग्लंडने अर्धा सामना चांगला खेळला. त्यांनी चेंडूने चांगली गोलंदाजी केली. पण भारतीय संघाने दुसऱ्या डावात जास्त चांगली गोलंदाजी केली. त्यांना पुढील आठवड्यातही अशीच खेळपट्टी मिळणार आहे. यात शंका नाही की इंग्लंडला चांगली कामगिरी करावीच लागेल. ते एकच चूक सारखी करु शकत नाही. त्यांना खेळपट्टी केवळ फिरकीपटूंसाठी आहे, अशा आरोपांच्या मागे लपणे परवडणार नाही. हे मुर्खपणाचे असेल.’
एवढेच नाही तर स्वानने असेही म्हटले की इंग्लंडमध्ये आल्यानंतर भारताला गवत असलेल्या खेळपट्टीवर खेळावे लागते. तो म्हणाला, ‘जेव्हा भारत इंग्लंडमध्ये येतो, तेव्हा त्यांना वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या हिरव्या खेळपट्टीवर खेळावे लागले आणि ते याबद्दल कधी तक्रार करत नाहीत. ते प्रयत्न करतात आणि सुधारणा करतात. विराट कोहली जेम्स अँडरसनचा सामना करता यावा यासाठी मेहनत करतो. इंग्लंडलाही आर अश्विन आणि अक्षर पटेलचा सामना करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.’
या दिग्गजांनी उठवले होते खेळपट्टीवर प्रश्न
केवळ इंग्लंडच्याच नाही तर भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगनेही खेळपट्टीबद्दल भाष्य केले होते. तसेच मायकल वॉन आणि केविन पीटरसन या माजी क्रिकेटपटूंनी खेळपट्टीबद्दल प्रश्न उपस्थित केले होते.
अहमदाबाद कसोटी महायुद्धानंतर सर्वात कमी चेंडूत संपलेला सामना
भारत विरुद्ध इंग्लंड संघात झालेला दिवस-रात्र कसोटी सामना केवळ १४०.२ षटकांत म्हणजेच केवळ ८४२ चेंडूत संपला. त्यामुळे भारतात सर्वात जलद संपलेला हा सामना ठरला आहे. तसेच हा सामना दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या कसोटी सामन्यांत सगळ्यात लवकर संपलेला सामना आहे. याआधी १९४६ मध्ये न्यूझीलंड वि ऑस्ट्रेलिया हा सामना ८७२ चेंडूंत संपला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१चे मुंबईतील आयोजन धोक्यात? बीसीसीआय करत आहे ‘या’ पर्यायांचा विचार
पोलिस उपअधीक्षक पदी नियुक्ती झाल्यानंतर हिमा दास झाली भावूक; म्हणाली, ‘माझे एक मोठे स्वप्न…’