मुंबई । इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघात 8 जुलैपासून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. 7 दिवसांच्या एकांतवास नियमामुळे इंग्लंडचा कर्णधार जो रूट पहिल्या कसोटीतून संघाबाहेर होऊ शकतो.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या कसोटी सामन्याच्या पूर्वी जो रुटची पत्नी दुसऱ्यांदा आई होणार आहे.
अशा वेळी तो त्याच्या परिवारासोबत राहिला तर संघात परतण्यापुर्वी त्याला सात दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या निर्देशानुसार रूटला राष्ट्रीय संघात सामील होण्यापूर्वी एक आठवडा एकांतवासामध्ये राहावे लागणार आहे. ईसीबी सतत त्यांच्या नियमांत बदल करत आहेत. पुढील महिन्यापर्यंत या नियमात बदल होऊ शकतो.
तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेतील पहिला कसोटी सामना एजिस बाऊल या ठिकाणी 8 ते 12 जुलै दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा आणि तिसरा कसोटी सामना ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळवण्यात येणार आहे. वेस्टइंडीजचा संघ या कसोटी मालिकेसाठी 9 जून रोजी इंग्लंडमध्ये दाखल होईल. त्यानंतर ओल्ड ट्रॅफर्ड येथे एकांतवासमध्ये राहील. याच ठिकाणी ते सराव करतील. त्यानंतर पहिल्या कसोटीसाठी एजिस बाऊल येथे रवाना होतील.
जो रूटने इंग्लंड क्रिकेट संघाकडून खेळताना 92 कसोटी सामन्यात 7599 धावा केल्या आहेत. यात 17 शतकांचा समावेश आहे. तर 145 एकदिवसीय सामन्यात 5922 धावा केल्या आहेत. ज्यात 16 धडाकेबाज शतकांचा समावेश आहे.