पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्या दरम्यान खेळली गेलेली सात सामन्याची भली मोठी टी20 मालिका रविवारी (2 ऑक्टोबर) समाप्त झाली. पाहुण्या इंग्लंडने अखेरचा सामना आपल्या नावे करत पाकिस्तानला मालिकेत 4-3 असे पराभूत केले. या निर्णायक सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी करणारा डेव्हिड मलान सामनावीर तर, युवा फलंदाज हॅरी ब्रुक याला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
📉 Old issues cost Pakistan series decider
🔥 England display impressive depth
🏆 #T20WorldCup 2022 implicationsKey talking points from the seventh #PAKvENG T20I ⬇️https://t.co/yiL9tnZqYc
— ICC (@ICC) October 3, 2022
लाहोर येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचे सलामीवीर सॉल्ट व हेल्स हे छोट्या मात्र आक्रमक खेळ्या करत बाद झाले. बेन डकेट व डेव्हिड मलानने 60 धावांची भागीदारी करत संघाला अडचणीतून बाहेर काढले. डकेट 30 धावांवर बाद झाल्यावर मलानने डावाची सूत्रे स्वतःकडे घेतली. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 47 चेंडूत 78 धावांची खेळी केली. संपूर्ण मालिकेत शानदार फॉर्ममध्ये असलेला हॅरी ब्रुक याने देखील वेगवान खेळी करत नाबाद 46 धावा केल्या. यासह इंग्लंडने धावफलकावर 209 धावा लावल्या.
सलग दुसऱ्या सामन्यात 200 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानचा डाव सुरुवातीपासूनच घसरला. शान मसूदचे अर्धशतक वगळता इतर फलंदाज झुंज देऊ शकले नाहीत. निर्धारित 20 षटकात पाकिस्तान केवळ 8 बाद 142 पर्यंत पोहोचू शकला. इंग्लंडसाठी ख्रिस वोक्सने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
तब्बल 17 वर्षांनी पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघासाठी ही मालिका कमालीची रोमांचक ठरली. दौऱ्याच्या सुरुवातीलाच कर्णधार जोस बटलर दुखापतग्रस्त झाला होता. मालिकेतील पहिला सामना इंग्लंड संघाने तर दुसरा सामना पाकिस्तान संघाने जिंकला होता. तिसरा सामना इंग्लंडने जिंकल्यानंतर पुढील दोन सामने पाकिस्तानने आपल्या नावावर केले होते. त्यानंतर सहाव्या आणि अखेरच्या सामन्यात विजय मिळवत इंग्लंडने हा दौरा यशस्वी केला. टी20 विश्वचषकापूर्वी इंग्लंडसाठी हा मालिका विजय आत्मविश्वास मिळवण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.