इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान हेडिंग्ले येथे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जातोय. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असून इंग्लंडने आपला पहिला बळी गमावला आहे. त्याचवेळी इंग्लंडचे खेळाडू दुसऱ्या दिवशी आपल्या दंडावर काळी पट्टी बांधल्याचे दिसून आले. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (इसीबी) याबाबत अधिकृत ट्विट करून माहिती दिली.
या कारणाने बांधली काळी पट्टी
हेडिंग्ले कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवातहोण्यापूर्वी इंग्लंड क्रिकेटसाठी एक दुःखद बातमी समोर आली. इंग्लंडचे माजी कर्णधार टेड डेक्स्टर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इंग्लंडचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधणार असल्याचे इसीबीकडून ट्विट करून सांगण्यात आले. डेक्स्टर यांचे इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठे योगदान होते. क्रिकेटमध्ये अशा अप्रिय घटना घडल्यानंतर दंडावर काळी पट्टी बांधण्याची प्रथा आहे.
Our players are wearing black armbands today to honour the passing of our former captain Ted Dexter.#ENGvIND pic.twitter.com/VF6ZeTEuVs
— England Cricket (@englandcricket) August 26, 2021
इंग्लंड क्रिकेटसाठी डेक्स्टर यांचे मोठे योगदान
टेड डेक्स्टर हे आक्रमक फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करत. त्यांना लॉर्ड टेड असे देखील संबोधले जात. १९५८ ते १९६८ या दहा वर्षांच्या काळात इंग्लंडचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी ६२ कसोटी सामने खेळले. त्यापैकी ३० सामन्यांमध्ये ते इंग्लंड संघाचे कर्णधार होते.
डेक्स्टर यांनी आपल्या कसोटी कारकीर्दीत ४७.८९ च्या सरासरीने ४५०२ धावा काढल्या होत्या. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावे २१,००० पेक्षा अधिक धावा व ४०० पेक्षा जास्त बळी होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी क्रीडा पत्रकार म्हणून काही काळ काम केले. त्यांनी काहीकाळ व्यवसायिक गोल्फ देखील खेळले. तसेच इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीचे अध्यक्ष तसेच मेरिलबोन क्रिकेट क्लबचे (एमसीसी) प्रमुख अशी जबाबदारी देखील त्यांनी निभावली होती. नुकत्याच संपलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यावेळी त्यांचा ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आलेला.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/mohammad-shami-bold-out-rory-burns-india-get-their-first-wicket-on-135-runs/