क्रिकेटमध्ये सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक बदल केले गेले आहेत. यामुळे क्रिकेटचा स्तर उंचावला तसेच क्रिकेटला आणखीन स्पष्ट स्वरूप प्राप्त झाले. यामुळे क्रिकेटसारख्या मोठ्या खेळातील असंख्य स्वरूपाच्या माहितीचा डाटा गोळा करणे सोपे जाऊ लागले.
क्रिकेटमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने थर्ड अंपायर, हॉक आय, स्निको मीटर, हॉट स्पॉट, स्पायडर कॅम, स्पीड गन, स्टंप माइक यांसारख्या नवीन गोष्टींचा अवलंब करण्यात आला. ज्यामुळे क्रिकेटला आधुनिक आणि स्मार्ट स्वरूप प्राप्त झाले. त्यातच आता क्रिकेटमध्ये आणखी एक नवीन प्रयोग करण्यात येणार आहे. तो म्हणजे स्मार्ट चेंडू.
क्रिकेटच्या मैदानात आता आपल्याला स्मार्ट चेंडूने सामना खेळलेला दिसेल. यंदाच्या कॅरिबियन प्रीमियर लीग (सीपीएल) मध्ये हा प्रयोग करण्यात येणार आहे. या चेंडूला स्पोर्ट्स कंपनी स्पोर्टकोर आणि कुकाबुरा यांनी संयुक्तपणे बनवले आहे. यामुळे एखाद्या महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये अशा स्मार्ट चेंडूचा वापर होताना आपल्याला पहिल्यांदाच दिसणार आहे.
या स्मार्ट चेंडू विषयी सविस्तर जाणून घेऊयात
स्मार्ट चेंडू म्हणजे नेमकं काय?
या चेंडूमध्ये एक खास प्रकारची सेंसर असलेली इलेक्ट्रॉनिक चीप लावण्यात येणार आहे. ज्याद्वारे आपल्याला चेंडूची गती, स्पिन आणि त्याची पावर किती आहे. या सर्व गोष्टींविषयी माहिती गोळा करता येणार आहे. यासाठी कंपनीने एक ॲप देखील बनवले आहे. ज्याद्वारे ही सर्व माहिती आपल्याला स्मार्टवॉच, मोबाईल, टॅबलेट किंवा कम्प्युटर/लॅपटॉप यांवर पाहता येऊ शकते.
पारंपारिक चेंडूच्या तुलनेत स्मार्ट चेंडूमध्ये काही बदल जाणवतील का?
पारंपारिक चेंडू आणि स्मार्ट चेंडू यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नसल्याचा कंपनीने दावा केला आहे. एखाद्या पारंपारिक चेंडूसारखाच हा स्मार्ट चेंडू देखील असणार आहे. केवळ चेंडूच्या आतमध्ये एक चीप लावण्यात येणार आहे. मात्र, यानेही चेंडूच्या वजनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे देखील कंपनीने सांगितले आहे.
या स्मार्ट चेंडूद्वारा कशा प्रकारे माहिती गोळा केली जाणार?
स्मार्ट चेंडू सध्या चेंडूची गती, स्पिन आणि पावर यांविषयी माहिती देणार आहे. या चेंडूची विशेषता ही असणार आहे की, चेंडू टप्पा पडल्यानंतरही स्पिन आणि गतीविषयी माहिती देणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाने केवळ गोलंदाजाने चेंडू सोडण्याच्या वेळी आणि चेंडू खेळपट्टीवर टप्पा पडण्याआधी पर्यंतची गती यांविषयी केवळ माहिती संपादित केली जाते. मात्र, स्मार्ट चेंडूमध्ये चेंडू बाउंस होण्याच्या आधीची गती, तसेच चेंडूचा टप्पा पडण्याआधीची गती आणि लगेच टप्पापडून झाल्यानंतरची गती या सर्व प्रकारच्या माहितीला आता या चेंडूद्वारा गोळा करता येणार आहे.
याबाबतची सर्व माहिती डाटा कशी गोळा केली जाते?
गोलंदाज ज्यावेळी चेंडू फेकणार असतो, त्याच्या आधी एक ऑपरेटर ॲपवरील एक बटन दाबणार. ज्याद्वारे चेंडूमधील चीप माहितीच्या रेकॉर्डिंगची प्रक्रिया सुरु करते. यानंतर सर्व माहिती/डाटा गोळा केली जाते. ज्याला मैदानात ठेवलेल्या राउटरच्या माध्यमाने एका क्लाऊडवर पाठविले जाते. त्यानंतर या विषयीची सविस्तर माहिती/डाटा आपल्याला लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर सांख्यिकी स्वरूपामध्ये दिसू शकते. त्याचबरोबर मोबाईलमध्ये माहिती मिळवायची झाल्यास ब्लूटूथद्वारा ही माहिती सरळ मोबाईलवरील त्या ॲपवर जाते, ज्याद्वारे आपण सर्व माहिती/डाटा पाहू शकतो.
माहिती गोळा करण्याच्या या प्रक्रियेला किती वेळ लागतो?
गोलंदाजाने चेंडू फेकल्यानंतर चेंडूद्वारा सर्व प्रकारची माहिती गोळा करून ही माहिती कम्प्युटर किंवा मोबाईलवर दिसण्यासाठी केवळ ५ सेकंद लागतात.
क्रिकेटच्या सर्व वस्तू बनवणारी कंपनी कुकाबुरा आणि स्पोर्टकोर यांनी संयुक्तपणे या चेंडूचे निर्माण केले आहे. या चेंडूला पारंपारिक चेंडू प्रमाणेच संपूर्ण रूप देण्यात आले आहे. ज्यामुळे गोलंदाजाला गोलंदाजी करताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. तसेच गोलंदाजातही या चेंडूने कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
–रोहितमुळे इंग्लंडच्या ओपनरला जीवनदान, झेल टिपला असता तर वेगळी असती सामन्याची परिस्थिती!
–भारताला स्वस्तात गुंडाळल्यानंतर अंडरसन म्हणाला, ‘आम्ही तेच केलं जे करायचं होतं’; वाचा पूर्ण भाष्य
–आंतरराष्ट्रीय पदार्पणात गांगुली, द्रविडची विकेट घेणाऱ्या अंपायरचा लीड्स सामन्यातून कसोटीत ‘डेब्यू’






