India vs England Test Series: भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना लीड्सच्या मैदानावर रंगला आहे. या मालिकेत इंग्लंडच्या गोलंदाजीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान इंग्लंडसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. दुखापतीमुळे बाहेर असलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडला आशा आहे की, तो भारताविरुद्ध 31 जुलैपासून ओव्हलमध्ये खेळल्या जाणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीपूर्वी पूर्णतः तंदुरुस्त होऊन संघाच्या निवडीसाठी उपलब्ध असेल. (Mark Wood comeback vs India)
मार्क वुड सध्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसन प्रक्रियेत आहे. या 35 वर्षीय गोलंदाजाला वर्षाच्या सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती आणि त्यामुळे मार्च महिन्यात त्याला सर्जरी करावी लागली होती. (Mark Wood knee surgery recovery) वुडने बीबीसी टेस्ट मॅच स्पेशलमध्ये सांगितले की, “माझे रिहॅब चांगल्या पद्धतीने सुरू आहे. मी नुकतीच सौम्य गोलंदाजी सुरू केली आहे, त्यामुळे मी पुनरागमनाच्या मार्गावर आहे.”
त्याने पुढे सांगितले, “मला अजूनही आशा आहे की मी या मालिकेत खेळू शकेन. म्हणून मी त्या खेळाडूंवर लक्ष ठेवतोय, जे माझ्या विरोधात खेळू शकतात. सध्या मी शेवटच्या कसोटीला लक्ष्य ठेवलं आहे. त्याआधी काहीही निश्चितपणे सांगणं थोडं घाईचं ठरेल. कदाचित मी शेवटच्या कसोटीतही खेळू शकणार नाही. पण माझं संपूर्ण लक्ष सध्या त्या सामन्यात काही भूमिका बजावण्यावर आहे.”
मार्क वुडच्या कसोटी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास त्याने इंग्लंडसाठी 37 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 119 विकेट्स घेतल्या आहेत. तर भारताविरुद्ध त्याने 4 कसोटी सामने खेळले असून त्याने 9 विकेट्स आपल्या नावावर आहेत. (Mark Wood Test stats vs India)





