भारत विरुद्ध इंग्लंडच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर सुरुवात झाली. हा सामना गुलाबी चेंडूने दिवस-रात्र प्रकारात प्रकाशझोतात खेळवला जात आहे. या सामन्यात खेळपट्टीचे स्वरूप पाहून इंग्लंडचा कर्णधार जो रूटने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
मात्र हा निर्णय पाहुण्या संघाच्या अंगाशी आल्याचे सिद्ध झाले. पहिल्या डावात फलंदाजी करतांना अवघ्या ११२ धावांवर सर्वबाद झाला. भारतीय गोलंदाजांनी विशेषतः फिरकीपटूंनी प्रभावी मारा केल्याने इंग्लंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. यासह इंग्लंडच्या नावावर काही लाजिरवाण्या पराक्रमांची नोंद झाली.
भारताविरुद्धची चौथी सर्वाधिक नीचांकी धावसंख्या
इंग्लंडने आजच्या सामन्यात पहिल्या डावात नोंदवलेली ११२ ही धावसंख्या त्यांची भारताविरुद्धची कसोटी सामन्यांमधील चौथी सर्वाधिक नीचांकी धावसंख्या ठरली. याआधी चौथ्या स्थानी लीड्स येथील १९८६ सालची १२८ ही धावसंख्या होती. भारताविरुद्धची इंग्लंडची सर्वाधिक नीचांकी धावसंख्या १९७१ साली ओव्हलच्या मैदानावरील १०१ ही आहे.
त्यानंतर १९७९-८० सालच्या मालिकेत मुंबई येथे इंग्लंडचा संघ १०२ धावांवर सर्वबाद झाला होता. ती इंग्लंडची दुसऱ्या क्रमांकाची नीचांकी धावसंख्या होती. तिसऱ्या क्रमांकावर लीड्सच्या मैदानावरीलच १९८६ सालातीलच १०२ ही धावसंख्या आहे. त्यांनतर आजच्या सामन्याचा क्रमांक लागतो.
इंग्लंडच्या भारताविरुद्धच्या नीचांकी धावसंख्या-
१) १०१ – द ओव्हल – १९७१
२) १०२ – मुंबई – १९७९/८०
३) १०२ – लीड्स – १९८६
४) ११२ – अहमदाबाद – २०२०/२१*
५) १२८ – लीड्स – १९८६
दरम्यान, सामन्याबाबत बोलायचे झाल्यास दुसरे सत्र संपले तेव्हा भारतीय संघाने ५ षटकात बिनबाद ५ धावा केल्या आहेत. सलामीवीर शुबमन गिल आणि रोहित शर्मा दोघेही खेळत असून पुढील सत्रात या दोघांवर इंग्लंडची वेगवान गोलंदाजी खेळून काढण्याचे आव्हान असेल. दुसरीकडे पहिल्या डावात अवघ्या ११२ धावांवर सर्वबाद झाल्याने इंग्लंड संघ संकटात आहे. त्यामुळे आगामी सत्रात भारतीय फलंदाजांना लवकरात लवकर माघारी पाठवण्याचा इंग्लिश गोलंदाज प्रयत्न करतील.
महत्वाच्या बातम्या:
इंग्लंडला पहिला विश्वचषक मिळवून देणारा ओवेस शाह
इशांतची शंभरी! कारकिर्दीतील महत्त्वाच्या सामन्यात खेळताना केले हे मोठे विक्रम