महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुणे येथील स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघात वनडे मालिका पार पडली. या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम लढतीत भारतीय संघाने बाजी मारत इंग्लंड संघाला ७ धावांनी पराभूत केले आहे. यासोबतच मालिका २-१ ने आपल्या नावावर केली आहे. या मालिकेनंतर आयसीसीने वर्ल्डकप सुपर लीगची नवी क्रमवारी जाहीर केली.
नव्या क्रमवारीत भारत या स्थानी
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेनंतर आयसीसीने वर्ल्डकप सुपर लीगची नवी क्रमवारी जाहीर केली आहे. २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी या लीगमध्ये सहभागी असलेल्या १३ संघांपैकी अव्वल ७ संघ सरळ पात्र ठरतील. तर, उर्वरित संघांना पात्रता फेरी खेळावी लागेल.
ताज्या क्रमवारीत भारतीय संघाविरुद्धच्या ही मालिका गमावली असली तरी, इंग्लंडच अव्वलस्थानी आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचे आणि इंग्लंडचे समसमान ४० गुण असले तरी, निव्वळ धावगतीच्या जोरावर इंग्लंडने पहिला क्रमांक काबीज केला आहे. त्यानंतर, न्यूझीलंड, अफगाणिस्तान व बांगलादेश हे पहिल्या पाचात असणारे उर्वरित संघ आहेत. वेस्ट इंडीज या क्रमवारीत सहाव्या स्थानी आहे.
इंग्लंड विरुद्धची मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ पाकिस्तानला पछाडत सातव्या क्रमांकावर आला आहे. क्रमवारीतील अखेरच्या पाच स्थानांवर अनुक्रमे झिम्बाब्वे, आयर्लंड, श्रीलंका, नेदरलॅंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा क्रमांक लागतो.
अखेरच्या सामन्यात भारताचा थरारक विजय
भारतीय संघाने या निर्णायक सामन्यात प्रथम फलंदाजी करताना शिखर धवन, रिषभ पंत व हार्दिक पंड्या यांच्या अर्धशतकांच्या जोरावर इंग्लंड संघाला ३३० धावांचे लक्ष्य दिले होते. या धावांचा पाठलाग करताना, सॅम करनने एकहाती झुंज देत नाबाद ९५ धावांची खेळी केली होती. शेवटच्या षटकापर्यंत सुरू राहिलेल्या या अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली. भारताकडून शार्दूल ठाकूरने ४ तर भुवनेश्वर कुमारने ३ बळी मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या –
जेव्हा पहिला भारतीय त्रिशतकवीर होण्याची भविष्यवाणी सेहवागने ३ वर्ष आधीच केली होती…
कोणी धावा चोपल्या, कोणी विकेट्स घेतल्या! पाहा भारत-इंग्लंड वनडे मालिकेतील टॉप-५ फलंदाज आणि गोलंदाज
‘सिजन ऑफ लाइफटाइम’, वनडे सीरिज विजयानंतर प्रशिक्षक शास्त्रींचे मन जिंकणारे ट्विट






