भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील अहमदाबादच्या स्टेडियमवर खेळवला गेलेला तिसरा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसात निकाली ठरला. भारताने या सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघावर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकूनही इंग्लंडला त्याचा लाभ उठवण्यात अपयश आले. पहिल्या डावात ११२ तर दुसऱ्या डावात अवघ्या ८१ धावांवर इंग्लंडचा डाव संपला. त्यामुळेच यजमानांचा विजय सुकर झाला.
सामन्यानंतर बोलताना इंग्लंडचा कर्णधार जो रूटने त्यांच्या पराभवाचे कारण सांगितले. पहिल्या डावात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतांना इंग्लंडचा संघ एकवेळ २ बाद ७०, अशा सुस्थितीत होता. मात्र त्यानंतर त्यांचा डाव पत्त्यासारखा कोसळला आणि इंग्लंडचा संघ पहिल्या डावात केवळ ११२ धावा करू शकला. हेच आमच्या पराभवाचे मुख्य कारण असल्याचे, जो रूटने सामन्यानंतर स्पष्ट केले.
“पहिल्या डावात मिळालेला फायदा गमावला”
अहमदाबादच्या फिरकीला अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर खरंतर नाणेफेक जिंकून इंग्लंडने सामन्यात एक पाऊल पुढे टाकले होते. नाणेफेकीचा फायदा घेत पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारत भारताला दबावात टाकण्याची त्यांना संधी होती. मात्र इंग्लंडने ती गमावली.
याबाबत बोलताना रूट म्हणाला, “आम्ही पहिल्या डावात जर २५० धावा जरी केल्या असत्या तरी या सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. पण आम्ही केवळ ११२ धावा केल्याने आमच्या सामना जिंकण्याच्या बऱ्याचशा आशा तिथेच संपुष्टात आला. आम्ही भारताला दुसऱ्या डावात १४५ धावांत सर्वबाद केले. मात्र दुसऱ्या डावातही फलंदाजांनी शरणागती पत्करल्याने आम्हाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.”
मात्र पुढील कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ नक्कीच पुनरागमन करेल, असा विश्वासही यावेळी रूटने व्यक्त केला. भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेतील पुढील आणि शेवटचा सामना याच स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. ४ मार्चपासून सुरु होणारा हा सामना पारंपारिक पद्धतीने लाल चेंडूवर खेळवला जाईल.
महत्वाच्या बातम्या:
INDvENG 3rd Test : भारताचा १० विकेट्सने दणदणीत विजय, मालिकेतही मिळवली आघाडी
भारताच्या विजयानं इंग्लंडचे कसोटी चॅम्पियनशीपचं स्वप्न भंगलं; आता भारत, ऑस्ट्रेलियामध्ये चूरस
फक्त ८४२ चेंडूत संपला सामना अन् अहमदाबाद कसोटीची झाली इतिहासात नोंद