क्रिकेटविश्वातील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी ऍशेस मालिका या वर्षीच्या अखेरीस ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली जाईल. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील या ऐतिहासिक मालिकेसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) आपला १७ सदस्यीय संघ जाहीर केला असून, यामध्ये काही वरिष्ठ खेळाडूंना जागा मिळाली नाही. या मालिकेला ८ डिसेंबरपासून सुरुवात होईल.
संकटात होती मालिका
मागील दोन वर्षांत जगभरात कोरोनाचे संकट घोंगावत असल्याने ऑस्ट्रेलिया सरकारने विदेशातून येणाऱ्या लोकांसाठी कडक नियमावली जाहीर केली होती. या नियमावलीतून सूट न मिळाल्यास आम्ही ऑस्ट्रेलिया दौरा करणार नाही अशी भूमिका इंग्लंडच्या काही वरिष्ठ खेळाडूंनी घेतलेली. त्यामुळे ही ऐतिहासिक मालिका होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, याबाबत तोडगा निघाल्यानंतर आता मालिका होण्याचा मार्ग खुला झाला आहे.
अनुनभवी आहे इंग्लंडचा संघ
इंग्लंड ही मालिका जो रूटच्या नेतृत्वात खेळेल. त्याला जोस बटलर, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड व जॉनी बेअरस्टो या वरिष्ठ खेळाडूंचे सहकार्य लाभेल. प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर व अष्टपैलू बेन स्टोक्स हे दुखापतीमुळे अजूनही संघाचा भाग होऊ शकले नाही. आर्चर चालू वर्षी मार्च महिन्यात भारत दौऱ्यावर दुखापतग्रस्त झाल्यानंतर मैदानात परतु शकला नाही. तर, मानसिक आरोग्याचे कारण देत स्टोक्स क्रिकेटपासून दूर आहे. २०१९ मध्ये मायदेशात झालेल्या ऍशेस मालिकेत या दोघांनी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. नव्या संघातील तब्बल १० खेळाडू प्रथमच ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका खेळतील.
ऍशेस मालिकेसाठी इंग्लंडचा संघ-
जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, रॉरी बर्न्स, जॉनी बेअरस्टो, झॅक क्राऊली, डॉम बेस, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, ओली रॉबिन्सन, ओली पोप, मार्क वूड, ख्रिस वोक्स, मार्क वूड, क्रेग ओव्हरटन व जॅक लिच
ऍशेस मालिकेचे वेळापत्रक-
पहिली कसोटी- ८ ते १२ डिसेंबर २०२१
दुसरी कसोटी- १६ ते २० डिसेंबर २०२१
तिसरी कसोटी- २६ ते ३० डिसेंबर २०२१
चौथी कसोटी- ५ ते ९ जानेवारी २०२२
पाचवी कसोटी- १४ ते १८ जानेवारी २०२२






