भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून यजमानांविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांनंतर भारत १-० अशा फरकाने आघाडीवर आहे. आता तिसरा सामना हेडिंग्ले येथे २५ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या सामन्यासाठी बुधवारी (१८ ऑगस्ट) इंग्लंड क्रिकेट बोर्डाने १५ सदस्ययी संघ जाहीर केला आहे.
या १५ जणांच्या इंग्लंड संघात डेविड मलानचे पुनरागमन झाले आहे. तो तिसऱ्या सामन्य़ात तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची दाट शक्यता आहे. असे असले तरी डॉम सिब्ली आणि जॅक क्रॉली यांना मात्र, इंग्लंड संघातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे ते आता संघातून बाहेर पडून आपल्या अनुक्रमे वार्विकशायर आणि केंट या काउंटी संघात सामील होतील.
याशिवाय जॅक लीचलाही १५ जणांमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. मात्र, तो राखीव फिरकीपटू म्हणून राहिल. १५ जणांच्या संघात फिरकीपटू म्हणून केवळ मोईन अलीला संधी देण्यात आली आहे. तसेच रॉरी बर्न्स आणि हसीब हमीद संघात कायम स्थान राखण्यात यशस्वी ठरले आहेत.
त्याचबरोबर इंग्लंडला तिसऱ्या कसोटीपूर्वी वेगवान गोलंदाज मार्क वूडच्या तंदुरुस्तीची चिंता सतावत आहे. लॉर्ड्सला झालेल्या दुसऱ्या कसोटी दरम्यान त्याला खांद्याची दुखापत झाली होती. तो जर तिसऱ्या कसोटीपूर्वी तंदुरुस्त झाला नाही, तर त्याच्याऐवजी साकीब महमूद आणि क्रेग ओव्हरटन यांचे पर्याय इंग्लंड संघाकडे आहेत. या दोघांनाही १५ जणांच्या संघात संधी मिळाली आहे.
याव्यतिरिक्त जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, सॅम करन हे अनुभवी खेळाडू १५ जणांच्या संघात कायम असून जो रुट संघाचे नेतृत्व करेल. त्याचबरोबर स्टुअर्ट ब्रॉड यापूर्वीच दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे. (England squad for third Test against India)
भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघ –
जो रुट (कर्णधार), रॉरी बर्न्स, हसीब हमीद, डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, सॅम करन, डॅन लॉरेन्स, साकीब मेहमूद, मोईन अली, क्रेग ओव्हरटन, मार्क वूड.
महत्त्वाच्या बातम्या –
‘लॉर्ड’ शार्दुल उर्वरित मालिकेत बसून राहणार बाकावर? ‘हे’ आहे कारण
पाकिस्तानमधील क्रिकेट स्टेडियम बनले शेत, पिकवला जातोय भोपळा अन् मिरच्या; व्हिडिओ व्हायरल