इंग्लंड संघ २०२२ एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडने डकवर्थ लुईस नियमानुसार अफगाणिस्तानचा १५ धावांनी पराभव करून अंतिम फेरीचे तिकीट पक्के केले. १९९८ नंतर पहिल्यांदाच इंग्लंडचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. यादरम्यान स्पर्धेच्या १० पर्वात त्यांचे हात रिकामे राहिले होते. विशेष बाब म्हणजे गेल्यावेळी इंग्लंडने अंतिम फेरीत स्थान मिळवून जेतेपदही पटकावले होते. त्यावेळी त्यांनी न्यूझीलंडचा पराभव केला होता. यावेळी इंग्लंडला अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्या संघाचा सामना करावा लागणार आहे.
अफगाणिस्तान संघाचा हा पहिलाच उपांत्य फेरीचा सामना होता, ज्यात त्यांना कमी अनुभवाचा फटका सहन करावा लागला. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी १३१ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, त्यानंतरही इंग्लंडचा संघ एकूण २३१ धावा करू शकला.
या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरताना इंग्लंडचा सलामीवीर जॉर्ज थॉमस याने दमदार अर्धशतक झळकावले. मात्र, याशिवाय टॉप ऑर्डरच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा आकडाही गाठता आला नाही. मधल्या फळीत जॉर्ज बेलने ६७ चेंडूत नाबाद ५६ धावांची खेळी केली. ज्यामुळे इंग्लंडला ४७ षटकांत २३१ धावांपर्यंत मजल मारता आली. अफगाणिस्तानने इंग्लंडच्या ६ विकेट्स घेतल्या. ज्यामध्ये नूर अहमद नावाच्या चायनामन फिरकी गोलंदाजाने 2 विकेट घेतल्या. त्याने आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात देखील आपले नाव नोंदविले आहे.
इंग्लंडकडून मिळालेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना उतरलेल्या अफगाणिस्तान संघाला पहिला धक्का लवकर बसला. मात्र, त्यानंतर इंग्लंडच्या हृदयाची धडधड वाढताना दिसली. दुसऱ्या विकेटसाठी अफगाणिस्तानच्या फलंदाजांमध्ये शानदार अर्धशतकी भागीदारी झाली आणि २४ व्या षटकात धावसंख्या १०० च्या जवळ पोहोचली. मात्र, यानंतर पुढील १२ धावांत संघाने २ विकेट गमावल्या. त्यानंतर पुन्हा ५व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पाहायला मिळाली.
इंग्लंडकडून मिळालेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघ एकेकाळी सुस्थितीत होता. पण, दबावाखाली त्यांच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी गमावलेल्या विकेट्समुळे इंग्लंडला सामन्यात पुनरागमनाची संधी मिळाली. अफगाणिस्तानला विजयासाठी शेवटच्या षटकात १८ धावांची गरज होती आणि त्यांची शेवटची जोडी मैदानात होती. शेवटी हे आव्हान अफगाणिस्तान संघ पार करू शकला नाही. परिणामी, संपूर्ण स्पर्धेत आपल्या शानदार खेळाने मने जिंकणाऱ्या अफगाण संघाचा प्रवास उपांत्य फेरीतच थांबला.
महत्वाच्या बातम्या-