बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवार,1 आॅगस्टपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर इंग्लंडने 9 बाद 285 धावा केल्या आहेत.
इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडकडून सलामीवीर फलंदाज अॅलिस्टर कूक आणि केटन जेनिंग्जने सावध सुरुवात केली.
मात्र कूकने लवकर विकेट गमावली. त्याला भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने नवव्या षटकात त्रिफळाचित केले. कूकने 28 चेंडूत 13 धावा करताना 2 चौकार मारले.
कूक बाद झाल्याने जेनिंग्जला साथ देण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा कर्णधार जो रुट आला. त्यानंतर मात्र रुट आणि जेनिंग्जने इंग्लंडचा डाव संभाळताना पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी रचली.
पण जेनिंग्जला मोहम्मद शमीने 42 धावांवर असताना बाद केले. जेनिंग्जपाठोपाठ काही वेळात डेव्हिड मलानही(8) बाद झाला. पण यानंतर रुट आणि जॉनी बेअरस्टोने इंग्लंडच्या डावाला आकार द्यायला सुरुवात केली. या दोघांनीही इंग्लंडकडून चौथ्या विकेटसाठी महत्त्वाची104 धावांची भागीदारी रचली.
हे दोघेही सामन्याच्या तिसऱ्या सत्रात बाद झाले. रुटला भारताचा कर्णधार विराट कोहलीने धावबाद केले. रुटने या डावात 156 चेंडूत 9 चौकारांच्या सहाय्याने 80 धावा केल्या. तर बेअरस्टोने 88 चेंडूत 70 धावा केल्या. यात त्याने 9 चौकार मारले. त्याला उमेश यादवने पायचीत बाद केले.
यानंतर मात्र इंग्लंडच्या बाकी फलंदाजांनी नियमित अंतराने विकेट गमावल्या. अन्य फलंदाजांपैकी बेन स्टोक्स(21), आदिल रशीद(13), आणि स्टुअर्ट ब्रॉड(1) यांनी धावा केल्या. तर जॉस बटलर शून्यावर बाद झाला.
पहिल्या दिवसाखेर इंग्लंडचे सॅम करन आणि जेम्स अँडरसन नाबाद आहेत. करनने 3 चौकारांसह नाबाद 24 धावा केल्या आहेत. अँडरसनला अजून एकही धाव करता आलेली नाही.
भारताकडून या डावात पहिल्या दिवसाखेर आर अश्विनने 60 धावात सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तसेच अन्य गोलंदाजांपैकी मोहम्मद शमी(2/62), उमेश यादव (1/56) आणि इशांत शर्मा(1/46) यांनी विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक:
इंग्लंड पहिला डाव: 9 बाद 285 धावा
(इंग्लंड- जो रुट-80 धावा, जॉनी बेअरस्टो-70 धावा; भारत- आर अश्विन-4/60 , मोहम्मद शमी-2/62)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–जो रुटने केला भारताविरुद्ध हा मोठा पराक्रम
–भज्जीच्या या दोन फोटोमध्ये काय आहे नक्की फरक?
–पहिल्याच कसोटी सामन्यात आर अश्विनचा खास विक्रम