लंडन। इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना रविवारी(६ जून) संपला. हा सामना अनिर्णित ठेवण्यात इंग्लंड संघाला यश मिळाले. सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडसमोर विजयासाठी २७३ धावांचे आव्हान होते. पण दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने ३ बाद १७० धावा करत हा सामना अनिर्णित राखला. न्यूझीलंडचा डेवॉन कॉनवे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
दुसऱ्या डावात इंग्लंड संघ २७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होते. त्यांच्याकडून डॉमनिक सिब्लीने सर्वाधिक नाबाद ६० धावांची खेळी केली. तसेच इंग्लंडचा कर्णधार जो रुटने ४० धावांची खेळी केली. सिब्लीला सलामीला रॉरी बर्न्सनेही चांगली साथ दिली होती. तो २५ धावा करुन बाद झाला. तसेच दिवसाचा खेळ संपला तेव्हा सिब्लीसह ओली पोप २० धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून निल वॅगनरने २ आणि टीम साऊथीने १ विकेट घेतली.
तत्पूर्वी न्यूझीलंडने दुसरा डाव शेवटच्या दिवशी ६ बाद १६९ धावांवर घोषित केला होता. तसेच पहिल्या डावात घेतलेल्या १०३ धावांच्या आघाडीसह इंग्लंडसमोर २७३ धावांचे आव्हान ठेवले होते. या डावात न्यूझीलंडकडून टॉम लॅथमने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली तर रॉस टेलरने ३३ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून ऑली रॉबिन्सनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या होत्या.
पहिल्या डाव कॉनवे, बर्न्सने गाजवला
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद ३७८ धावा केल्या. न्यूझीलंडकडून या सामन्यातून पदार्पण करणाऱ्या डेवॉन कॉनवेने द्विशतकी खेळी केली. त्याने २०० धावांची खेळी केली. ही खेळी त्याने ३४७ चेंडूत २२ चौकार आणि १ षटकारासह केली.
त्याच्याव्यतिरिक्त या डावात हेन्री निकोल्सने ६१ धावांची अर्धशतकी खेळी केली. निकोल्स आणि कॉनवेमध्ये १७४ धावांची भागीदारी झाली. त्यांच्या या खेळीमुळेच न्यूझीलंडला ३०० धावांचा टप्पा सहज ओलांडता आला. इंग्लंडकडून या डावात पदार्पणवीर ऑली रॉबिन्सनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर मार्क वूडने ३ विकेट्स आणि जेम्स अँडरसनने २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लंडने डॉमनिक सिब्ली आणि झॅक क्रावलीची विकेट झटपट गमावली. मात्र सलामीला फलंदाजीला आलेला बर्न्स सुरुवातीपासून चांगला खेळत होता. त्याने कर्णधार जो रुटला साथीला घेतले आणि ९३ धावांची भागीदारी करत इंग्लंडला सावरले. रुट ४२ धावा करुन बाद झाला. त्यानंतर ऑली पोप २२ धावा करुन बाद झाला. तर लॉरेन्स आणि जेम्स ब्रॅसी शुन्यावर बाद झाले.
एका बाजूने या विकेट्स जात असताना बर्न्सने दुसरी बाजू सांभाळली होती. अखेर ७ व्या विकेटसाठी त्याला ऑली रॉबिन्सनची साथ मिळाली. या दोघांनी ६३ धावांची भागीदारी केली. रॉबिन्सन ४२ धावा करुन बाद झाला. अखेर बर्न्सने जेम्स अँडरसनसह ५२ धावांची भागीदारी केली. पण बर्न्स इंग्लंडच्या १० विकेटच्या रुपात २९७ चेंडूत १६ चौकार आणि १ षटकारासह १३२ धावा करुन बाद झाला. त्यामुळे इंग्लंडचा डाव २७५ धावांवर संपुष्टात आला आणि न्यूझीलंडला १०३ धावांची आघाडी मिळाली. न्यूझीलंडकडून या डावात टीम साऊथीने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. तसेच काईल जेमिसनने ३ विकेट्स घेतल्या आणि निल वॅगनरने १ विकेट घेतली.
सामन्यात पावसाचा व्यत्यय
या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने खेळाचा बराच वेळ वाया गेला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी तर खेळ होऊ शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
महत्त्वाची बातमी! दिग्गज रॉजर फेडररची फ्रेंच ओपनमधून माघार; दिले ‘हे’ कारण
कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी युवीने वाचला भारतीय संघासमोरील अडचणींचा पाढा; म्हणाला…
द ग्रेट लारा! वेस्ट इंडीज दिग्गजाच्या ‘त्या’ ऐतिहासिक खेळीला २७ वर्ष पूर्ण