मुंबई । पाकिस्तानचा संघ सध्या तीन कसोटी आणि तीन टी -20 सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौर्यावर आहे. पाहुण्या संघाचे कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न अगोदरच संपुष्टात आले आहे. शुक्रवारपासून कसोटी मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना खेळला जाईल. कसोटी मालिकेनंतर 28 ऑगस्टपासून टी -20 मालिका सुरु होणार आहे. दरम्यान पाकिस्तानचा अनुभवी अष्टपैलू शोएब मलिक 3 टी -20 सामन्यांच्या मालिकेसाठी दुबईमार्गे इंग्लंडला रवाना झाला आहे.
संघात येण्यापूर्वी शोएब मलिकची दोनदा कोरोना टेस्ट होईल आणि जर त्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या तरच तो साऊथॅम्प्टनमध्ये संघात सामील होऊ शकेल. शोएब मलिक याने इंग्लंडकडे रवाना होण्यापूर्वी एक फोटो शेअर केला आहे. त्यानंतर लोकांना त्याला विचारले की आपण कोठे जात आहात?
शोएब मलिकने फोटो शेअर करताना तो इंग्लंडकडे जात असल्याची माहिती त्याच्या चाहत्यांना दिली नाही. त्याने त्याच्या चाहत्यांना अंदाज लावण्यास सांगितले. काही चाहते तो इंग्लंडला जात असल्याचे तर काही चाहते तो भारताकडे जात असल्याचा अंदाज लावत आहेत. बहुदा तो इंग्लंडकडे जात असावा, कारण टी -20 मालिका सुरू होण्यास कमी वेळ शिल्लक आहे.
शोएब जूनमध्ये संघासोबत इंग्लंडला रवाना झाला नाही. कुटूंबाला भेटण्यासाठी त्याला भारतात जायचे होते. त्यामुळे त्याला संघात उशिरा सामील होण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला परवानगी दिली होती. त्याची पत्नी सानिया मिर्झा आणि मुलगा सध्या भारतात आहेत. 24 जुलै रोजी तो प्रथम कुटूंबियांना भेटून तो संघात सामील होणार होता, परंतु 31 जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने तो भारतात येऊ शकला नाही. अखेर तो त्याच्या कुटुंबीयांना न भेटताच इंग्लंडला रवाना झाला.