श्रीलंका आणि इंग्लंड दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 6 विकेटने विजय मिळवला. या विजयासोबतच इंग्लंडने इतिहास रचत मालिका 2-0 जिंकली. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत 381 धावा केल्या व इंग्लंडचा पहिला डाव 344 धावांवर रोखला. श्रीलंकेने सामन्यात 37 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली असल्याने त्यांचे पारडे जड मानले जात होते.
मात्र आपल्या दुसऱ्या डावात श्रीलंकेचा पूर्ण संघ केवळ 126 धावांवरच आटोपला व इंग्लंडने 6 गडी राखत सामना व मलिका आपल्या नावे केली. दरम्यान हा सामना क्रिकेट सोबतच एका मजेशीर प्रसंगासाठी देखील संपूर्ण क्रिकेटविश्वात प्रसिद्ध झाला आहे.
इंग्लंडच्या पहिल्या डावातील 35वे षटक सुरू असताना जॉनी बेस्टो फलंदाजी करत होता. यावेळी श्रीलंकेचा यष्टीरक्षक निरोशेन डीकवेलाने बेअरिस्टोची फिरकी घेत तो केवळ पैशासाठी खेळत असल्याचे म्हटले. बेअरिस्टोला भारत दौऱ्यातून डच्चू देण्यात आल्याने डीकवेला म्हणाला, “बेअरिस्टो तुला भारत दौऱ्यातून संघाबाहेर केले आहे. आता तू भारतात आयपीएल खेळणार. तू क्रिकेट फक्त पैशासाठी खेळतोय.” दरम्यान हा सर्व मजेशीर प्रसंग सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
दरम्यान सामन्याचा विचार केला असता इंग्लंडचा कर्णधार जो रूटने आपल्या शानदार फलंदाजीमुळे इंग्लंडला विजय मिळवून दिला. रूटने इंग्लंडच्या पहिल्या डावात झुंजार शतकी खेळी केली. रूटच्या या खेळीमुळेच इंग्लंडला श्रीलंकेच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या जवळ पोहोचण्यात यश मिळाले. रुटने 309 चेंडूत 18 चौकारांच्या मदतीने 186 धावांची शानदार खेळी केली. तर दुसरीकडे श्रीलंकेसाठी या सामन्यात लसिथ एम्बुलडेनिया एक नवा स्टार बनून पुढे आला आहे. एम्बुलडेनिया संपूर्ण सामन्यात तब्बल 10 बळी मिळवले.
श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर इंग्लंडचा भारत दौरा सुरू होणार आहे. इंग्लंड संघ या दौर्यात वनडे व टी-20 मालिकेसोबतच 4 सामन्यांची बहुप्रतीक्षित कसोटी मालिका खेळणार आहे. 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कसोटी सामन्याद्वारे या मालिकेला सुरुवात होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : गतविजेत्या कर्नाटकाचा पराभव, पंजाबचा उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश
भारतीय संघात हार न मानण्याची वृत्ती वाढली, माजी इंग्लिश कर्णधाराची स्तुतिसुमने
IND Vs ENG: विराट कोहलीसाठी डोकेदुखी; अश्विन, सुंदर आणि कुलदीपमध्ये कुणाची करावी निवड?