मॅनचेस्टर। आजपासून (१६ जुलै) वेस्ट इंडिजविरुद्ध सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ मालिकेत बरोबरी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. परंतु इंग्लंडला वेस्ट इंडिजपासून सावध रहावे लागेल. कारण मालिका जिंकून इतिहास रचण्याची संधी वेस्ट इंडिजकडे असणार आहे.
साऊथँप्टन येथे खेळण्यात आलेला पहिला सामना वेस्ट इंडिजने ४ विकेट्सने जिंकला आहे. त्याचबरोबर त्यांनी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आपल्या दुसऱ्या अपत्याच्या जन्मानंतर रूटला पहिल्या कसोटी सामन्यात खेळता आले नव्हते. त्यामुळे इंग्लंड संघाला त्याच्या अनुपस्थितीत बेन स्टोक्सकडे नेतृत्व सोपवावे लागले. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात २०४ धावांवर संपुष्टात आला होता. त्याला प्रत्युत्तर देत वेस्ट इंडिज संघाने ३१८ धावा करत ११४ धावांची आघाडी घेतली होती. शेवटी या धावांचा वेस्ट इंडिजला फायदा झाला.
इतिहास रचण्याची संधी
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघातील ३ सामन्यांची कसोटी मालिका जैव सुरक्षित वातावरणात खेळली जात आहे. या दोन्ही संघांमधील तिसरा कसोटी सामना ओल्ड ट्रॅफर्ड येथे २४ जुलैपासून खेळला जाणार आहे. अशामध्ये वेस्ट इंडिजला इंग्लंडमध्ये ३२ वर्षांनंतर पहिली मालिका जिंकण्यासाठी या २ कसोटी सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळविण्याची आवश्यकता आहे.
इंग्लंड संघ करू शकतो पुनरागमन
इंग्लंड संघाने मागील १० मालिकांमध्ये ८ वेळा पहिल्या कसोटी सामन्यात पराभव स्विकारला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काही काळापूर्वी खेळलेला पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत झाल्यानंतर शानदार पुनरागमन करत ३-१ ने मालिका जिंकली होती.
इंग्लंड संघातील बदल
दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघात बदल केले आहे. रूटचे संघात पुनरागमन झाले आहे, तर जो डेन्लीला संघातून वगळण्यात आले आहे. डेन्लीने पहिल्या सामन्यात १८ आणि २९ धावांची खेळी केली होती. रूटच्या पुनरागमनामुळे इंग्लंड संघाच्या मधल्या फळीला मजबूती मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये झॅक क्राऊले, ऑली पॉप आणि पहिल्या सामन्यातील प्रभारी कर्णधार आणि अष्टपैलू बेन स्टोक्सचाही समावेश आहे.
वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) आणि मार्क वूड (Mark Wood) यांना विश्रांती देण्यात आली आहे, तर सॅम करन (Sam Curran) आणि ऑली रॉबिनसन (Ollie Robinson) या २ गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. रॉबिनसनला पहिल्यांदाच इंग्लंडच्या राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली आहे.
बटलरला सुधारणेची आवश्यकता
इंग्लंड संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलरने (Jos Buttler) दोन्हीही भूमिकांमध्ये अपेक्षित कामगिरी केली नाही. त्याने पहिल्या डावात ३५ धावांची खेळी केली, तर दुसऱ्या डावात तो केवळ ९ धावा करत बाद झाला होता. इतकेच नव्हे तर त्याने दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या जर्मन ब्लॅकवूडला (Jermaine Blackwood) जीवदान दिले होते. याचा फायदा उचलत ब्लॅकवूडने ९५ धावांची विजयी खेळी केली. असे असले तरीही बटलरला अंतिम एकादशमध्ये स्थान मिळाले आहे.
आपल्या संघात बदल नाही करणार वेस्ट इंडिज संघ
वेस्ट इंडिज संघ आपल्या विजयी संघामध्ये कोणताही बदल न करता दुसऱ्या कसोटी सामन्यात मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. शाय होपचा खराब फॉर्म त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. ब्लॅकवूड पुन्हा एकदा मोठी खेळायची आहे. तो म्हणाला, की जेव्हा तो क्रीजवर असतो, तेव्हा तो स्वत: दबावात नसतो, तर विरोधी संघ दबावात असतो.
वेस्ट इंडिज संघ-
जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, जॉन कँपबेल, शाय होप, शमर ब्रूक्स, रोस्टन चेस, जर्मन ब्लॅकवूड, शेन डावरिच (यष्टीरक्षक), राहकीम कॉर्नवॉल, केमार रोच, शॅनन गॅब्रियल, अल्झारी जोसेफ, चेमर होल्डर, रेमन रायफर, नक्रुमा बोनर.
इंग्लंड संघ-
जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिब्ले, झॅक क्राऊले, बेन स्टोक्स, ऑली पोप, जॉस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स, ऑली रॉबिनसन.





