गॉल। सोमवारी (२५ जानेवारी) इंग्लंड संघाने श्रीलंका विरुद्ध गॉल येथे दुसऱ्या कसोटी सामन्यात ६ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबरच २ सामन्यांची कसोटी मालिका २-० अशा फरकाने जिंकली. या मालिकेतील पहिल्या सामन्यातही इंग्लंडने विजय मिळवला होता. त्यामुळे इंग्लंडने एक मोठा विक्रम केला आहे.
इंग्लंडचा हा परदेशातील सलग ५ वा कसोटी विजय होता. त्यामुळे इंग्लंडने तब्बल १०७ वर्षांनंतर परदेशी भूमीत सलग ५ कसोटी विजय मिळवण्याचा कारनामा केला आहे. याआधी इंग्लंडने परदेशात ५ किंवा त्यापेक्षा अधिक सलग कसोटी विजय १९११ ते १९१४ दरम्यान मिळवले होते. त्यावेळी इंग्लंडने ७ सामने सलग जिंकले होते.
इंग्लंड १०७ वर्षांपूर्वी या देशांत मिळवले विजय
इंग्लंडने १०७ वर्षांपूर्वी १९११-१२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ सामने आणि १९१३-१४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ सामने असे मिळून परदेशात सलग ७ सामने जिंकले होते.
सध्याच्या जो रुटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने परदेशात ५ सलग सामन्यात विजय मिळवला असला तरी त्यांना इंग्लंडचा १०७ वर्षांपूर्वीचा सलग ७ विजय मिळवण्याचा विक्रम मोडण्यासाठी भारताचे मोठे आव्हान आहे. इंग्लंडला १०७ वर्षांपूर्वीचा परदेशात सलग ७ सामने जिंकण्याचा विक्रम मोडायचा असेल तर ५ फेब्रुवारीपासून भारताविरुद्ध सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेतील चेन्नई येथे होणाऱ्या दोन्ही कसोटी सामन्यात विजय मिळवावा लागेल.
श्रीलंकेआधी दक्षिण आफ्रिकेला केले होते पराभूत
जो रुटच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या इंग्लंड संघाने श्रीलंकेच्या आधी मागीलवर्षी दक्षिण आफ्रिका दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी ३ सामने सलग जिंकले होते. त्यांनी केपटाऊनमध्ये झालेल्या कसोटीत १८९ धावांनी, पोर्ट एलिझाबेथ येथे झालेल्या कसोटीत एक डाव आणि ५३ धावांनी आणि जोहान्सबर्ग कसोटीत १९१ धावांनी विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेआधी पंत धोनीच्या भेटीला, साक्षीने शेअर केले फोटो
ग्लेन मॅक्सवेलनेही आळवला बायो बबलविरोधी सूर, म्हणाला…
टॉप ४ : भारताविरुद्ध २०१२ सालच्या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या खेळाडूंनी केलेल्या अविस्मरणीय खेळी