ब्रिस्टोल। बुधवारी इंग्लंड महिला संघ विरुद्ध भारतीय महिला संघात वनडे मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने ८ विकेट्सने विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. इंग्लंडकडून टॅमी ब्यूमॉन्ट आणि नताली सायव्हर या दोघींनी नाबाद अर्धशतके ठोकली.
या सामन्यात भारताने इंग्लंडला विजयासाठी ५० षटकांत २०२ धावा करण्याचे आव्हान दिले होते. हे आव्हान इंग्लंडने ३४.५ षटकात २ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. २०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खास झाली नव्हती. इंग्लंडची सलामीला फलंदाजी करणऱ्या लॉरेन विनफिल्ड हिल हिने झुलन गोस्वामीच्या गोलंदाजीवर ५ व्या षटकात १६ धावांवर विकेट गमावली.
पण त्यानंतर सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या ब्यूमॉन्टला कर्णधार हिदर नाईटने साथ देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५९ धावांची अर्धशतकी भागीदारी केली. पण ही भागीदारी रंगत असताना नाईटला एकता बिश्तने १८ धावांवर त्रिफळाचीत केले. यानंतर मात्र, इंग्लंड संघाने एकही विकेट गमावली नाही.
ब्यूमॉन्टने सायव्हरला साथीला घेत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ११९ धावांची भागीदारी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. ब्यूमॉन्टने ८७ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ८७ धावा केल्या. तर सायव्हरने ७४ चेंडूत १० चौकार आणि १ षटकारासह नाबाद ७४ धावा केल्या.
तत्पूर्वी भारताची सुरुवात खराब झाली. या सामन्यातून वनडे पदार्पण करणारी शेफाली वर्मा १४ चेंडूत १५ धावा करत ५ व्या षटकात कॅथरिन ब्रंटच्या गोलंदाजीवर अन्या श्रबसोलकडे झेल देऊन बाद झाली. त्यापाठोपाठ स्म्रीती मंधनानेही १० धावांवर विकेट गमावली. पण त्यानंतर पुनम राऊत आणि कर्णधार मिताली राजने इंग्लंडच्या उत्तम गोलंदाजी आक्रमणासमोर अत्यंत सावध खेळ करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघींनी ९४ चेंडून ५६ धावांची भागीदारी रचली.
पुनमने ६१ चेंडूत ३२ धावा करत विकेट गमावली. त्यापोठापाठ हरमनप्रीत कौरही केवळ १ धाव करुन माघारी परतली. त्यानंतर दिप्ती शर्माने मितालीची साथ देताना ५ व्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी रचली. पण दिप्तीला श्रबसोलने ३० धावांवर पायचीत केले आणि ही भागीदारी तोडली. काहीवेळातच सोफी इक्लेस्टोनने अर्धशतकी खेळी केलेल्या मितालीला त्रिफळीचीत करत भारताला मोठा धक्का दिला. मितालीने १०८ चेंडूत ७ चौकारांसह ७२ धावांची खेळी केली.
त्यानंतर तळातल्या फलंदाजांनी आपले थोडे योगदान देत भारताला ५० षटकात ८ बाद २०१ धावांपर्यंत पोहचवले. इंग्लंडकडून सोफी इक्लेस्टोनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर कॅथरिन ब्रंट आणि अन्या श्रबसोलने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच केट क्रॉसला १ विकेट मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या –
व्हिडिओ: श्रीलंकन खेळाडूची अखिलाडूवृत्ती, प्रतिस्पर्धी खेळाडूला दिला जाणूनबुजून धक्का
काय सांगता! वेस्ट इंडिजचे’हे’ ४ खेळाडू तब्बल ६ वर्षांनी एकत्र खेळले आंतरराष्ट्रीय टी२० सामना