मुंबई । इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी फलंदाज इयान बेलने देशांतर्गत हंगाम संपल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली आहे. इंग्लंडकडून कसोटी, वनडे आणि टी -20 अशी तिन्ही प्रकारात खेळणार्या इयान बेलने ट्विटरवर व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. बेलने अखेर 2015 मध्ये इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. शरीर साथ देत नसल्याने त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे सांगितले.
बेलने 2004 मध्ये इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आता तो 38 वर्षांचा आहे. इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत बेल चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 118 कसोटी सामने खेळले असून, एका दुहेरी शतकासह त्याने एकूण 7727 धावा केल्या आहेत. ओव्हल येथे भारताविरुद्ध 235 धावांची खेळी केली होती. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ही सर्वोच्च धावसंख्या होती.
बेल पाच वेळा अॅशेस जिंकणार्या इंग्लंड संघाचा सदस्य झाला आहे. त्याने इंग्लंडकडून 118 कसोटी सामने खेळले, सात हजारांहून अधिक धावा केल्या आणि 22 शतके केली. याशिवाय त्याने फलंदाजीद्वारे 46 अर्धशतकेही केली होती. त्याने 161 वनडे सामन्यात पाच हजारहून अधिक धावा केल्या आणि 4 शतके आणि 35 अर्धशतकेही केली. त्याने आठ टी -20 सामने खेळले आणि त्यात188 धावा केल्या. येथेही त्याने एक अर्धशतक झळकावले.