सध्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना गुरुवारपासून (२ सप्टेंबर) सुरू झाला आहे. पहिल्या डावात भारतीय संघाची अत्यंत खराब सुरुवात झाली होती. मात्र, शार्दुल ठाकूर आणि कर्णधार विराट कोहली यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघाने १९१ धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या इंग्लंड संघाची देखील सुरुवात अत्यंत खराब राहिली होती. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रापर्यंत इंग्लंडची स्थिती ६२ धावांवर ५ अशी होती. मात्र, अनेक दिवसांनी संघात स्थान मिळालेल्या ओली पोपने फलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. या उत्कृष्ट अर्धशतकी खेळीबाबत पोपने आता खुलासा केला आहे.
पोपच्या मते त्याने स्टांसमध्ये केलेल्या बदलामुळे तो भारतीय गोलंदाजांसमोर खेळू शकला. तसेच अशा खेळपट्टीवर विकेट मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागू शकते. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी विकेट मिळवणे कठीण असल्याचे देखील मत व्यक्त केले. इंग्लंडने भारतीय संघाला पहिल्या दिवशी केवळ १९१ धावांवर बाद केले होते.
पोपला याआधीच्या तीनही सामन्यात संधी मिळाली नव्हती. मात्र, त्याच्या घरच्या मैदानात त्याला संधी मिळताच त्याने संधीचे सोने केले आणि ८१ धावांची उत्कृष्ट खेळी केली. त्याने जॉनी बेयरस्टो आणि मोइन अलीसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी देखील केली होती. ज्यामुळे इंग्लंडचा संघ २९० धावांवर पोहोचू शकला.
दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना पोप म्हणाला, “कदाचित आता खेळण्यातील गती थोडी बदलू शकते. चेंडू सॉफ्ट होऊ शकतो आणि आऊट फिल्डच्या गतीत देखील बदल होऊ शकतो. त्यामुळे आम्हाला विकेट घेण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागू शकते. आशा करतो की आम्हाला विकेट लवकर मिळेल.”
तसेच पोपने केलेल्या उत्कृष्ट फलंदाजी बाबत बोलताना म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर या मालिकेत कर्णधार जो रूट ज्या प्रकारे खेळला, ते मी पाहिले होते. त्यानंतर प्रशिक्षक आणि काही वरिष्ठ खेळाडूंसोबत सकारात्मक चर्चादेखील झाली होती. भारतीय गोलंदाजी विभाग अत्यंत उत्कृष्ट आहे.”
“या मालिकेतील माझ्या पहिल्याच कसोटी सामन्यात आणि माझ्या घरच्या मैदानात खेळल्याचा मी भरपूर आनंद घेतला. त्यामुळे हा माझ्यासाठी खूप विशेष क्षण होता. मला माझा खेळ आणि डिफेन्सवर विश्वास होता आणि संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ज्यामुळे संघ सध्या चांगल्या स्थितीत आहे, यामुळे मी अत्यंत खूष आहे,” असेही तो म्हणाला.
दरम्यान, चौथ्या कसोटी सामन्यात भारताची खराब सुरुवात झाली होती. त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि शार्दूल ठाकूरने चांगली खेळी करत समाधानकारक १९१ धावा केल्या. तर इंग्लंड संघाचे देखील सुरुवात अत्यंत खराब राहिली होती पहिल्या दिवसानंतर इंग्लंडची स्थिती ५३ वर ३ अशी होती.
त्यानंतर दुसर्या दिवशीच्या पहिल्या सत्रात देखील इंग्लंडची खराब सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर इंग्लंडच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी इंग्लंडचा डाव सावरला आणि इंग्लंडला २९० धावांपर्यंत पोहोचवले. त्याचबरोबर इंग्लंडने ९९ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसर्या डावात भारतीय फलंदाजांनी चांगली सुरूवात केली. दुसऱ्या दिवसाच्या शेवटपर्यंत भारतीय संघाची स्थिती ४३ वर शून्य बाद अशी होती.
महत्वाच्या बातम्या –
–टी२० क्रमवारीत उलटफेर; बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला टाकले मागे, पाहा पहिल्या ५ क्रमांकांवर कोणते संघ
–हिटमॅनचा मोठा विक्रम! रोहित ‘असा’ विक्रम करणारा सचिन पाठोपाठ जगातला दुसराच सलामीवीर
–4th Test Live: पहिल्या सत्रात भारताने घेतली आघाडी, रोहित शर्मा अर्धशतकाच्या जवळ