बीसीसीआयने रविवारी भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याची घोषणा केली होती. या दौऱ्यात मर्यादित षटकांचे सामने खेळवले जातील हे देखील त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र बीसीसीआयने दौऱ्याच्या संपूर्ण कार्यक्रम पत्रिकेबाबत काही माहिती स्पष्ट केली नव्हती.
पण आता दौऱ्याच्या रूपरेषे बाबत माहिती समोर येते आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या हवाल्याने या दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम स्पष्ट झाला असून सामन्यांच्या तारखा देखील समोर आल्या आहेत. त्यानुसार १३ जुलै पासून या दौऱ्याला सुरुवात होईल.
वनडे आणि टी२० मालिकेचे आयोजन
हा दौरा केवळ मर्यादित षटकांच्या मालिकांचा असून यात फक्त वनडे आणि टी२० मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार या दौर्यात सर्वप्रथम वनडे मालिका खेळवली जाईल. १३ जुलै रोजी वनडे मालिकेतील पहिला सामना खेळवला जाईल. त्यानंतर १६ आणि १९ जुलै रोजी वनडे मालिकेचे उर्वरित दोन सामने खेळवले जातील.
वनडे मालिका संपल्यानंतर टी२० मालिकेची सुरुवात होईल. या मालिकेचा पहिला सामना २२ जुलै रोजी खेळवला जाईल. तर उर्वरित दोन सामने अनुक्रमे २४ आणि २७ जुलै रोजी खेळवले जातील. अशा प्रकारे तीन वनडे सामने आणि तीन टी२० सामने खेळवण्यात येतील.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ जाणार श्रीलंकेत
आत्ता ठरलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ श्रीलंकेत दाखल होईल. ५ जुलैला भारतीय संघ श्रीलंकेत दाखल होईल तर २८ जुलैला परतीचा प्रवास करेल. श्रीलंकेत गेल्यावर भारतीय संघाला विलगीकरणात राहणे, सक्तीचे असेल. तसेच सगळे सामने बायो बबल मध्ये खेळवले जातील. त्यामुळे प्रेक्षकांना मैदानावर प्रवेश दिला जाणार नाही, अशीच शक्यता आहे. त्याचप्रमाणे आत्ता सामन्यांच्या तारखा ठरल्या असल्या तरी देखील सामन्यांची स्थळे मात्र नंतर निश्चित करण्यात येतील.
महत्त्वाच्या बातम्या –
तो खेळाडू इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळवू शकत होता, राहुल द्रविडने व्यक्त केले मत
कोहली-रोहितच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौर्यावर कोण करणार नेतृत्व? ‘हे’ आहेत भारताचे पर्याय
आयसीसीच्या मोठ्या पुरस्कारामध्ये बाबर आझमने मारली बाजी; ‘या’ क्रिकेटपटूंना टाकले मागे