आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा मंच सजू लागला आहे. १८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे खेळाडूंचा लिलाव पार पडेल. या लिलावात, दरवर्षीप्रमाणे अनेक दिग्गज तसेच देशांतर्गत क्रिकेट गाजवलेले युवा क्रिकेटपटू मालामाल होतील. मात्र, सध्या प्रत्येक संघात अनेक करोडपती खेळाडू सामील आहेत. आज आपण आयपीएलमधील आठही संघांतील सर्वात महागड्या खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत.
१) चेन्नई सुपर किंग्स- एमएस धोनी
आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून चेन्नई संघाचा कर्णधार असलेला एमएस धोनी सध्या चेन्नईचा सर्वात महागडा खेळाडू आहे. सीएसके संघ व्यवस्थापन त्याला दरवर्षी १५ कोटी रुपये इतकी रक्कम देत असते. धोनी हा आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमधून १५२.८० कोटी रुपये कमावले आहेत. २०१६ व २०१७ आयपीएल हंगामावेळी चेन्नई सुपर किंग्स संघाला निलंबित केल्याने धोनी रायझिंग पुणे सुपरजायंट संघासाठी खेळला होता. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने तीन आयपीएल विजेतेपदे मिळवली आहेत.
२) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर- विराट कोहली
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा बेंगलोरस्थित रॉयल चॅलेंजेस बेंगलोर संघाचाच नव्हे तर आयपीएलमधीलच सर्वात महागडा खेळाडू आहे. विराट एका हंगामात खेळण्यासाठी १७ कोटी रुपये घेतो. विराट असा एकमेव खेळाडू आहे ज्याने सर्व हंगामात एकाच संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. विराटने आत्तापर्यंत आयपीएलद्वारे १४३.२ कोटी रुपये कमावले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला विराटच्या नेतृत्वात आत्तापर्यंत एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावत आले नाही.
३) मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा
आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा मुंबईचा सर्वात महागडा खेळाडू आहे. रोहितने आतापर्यंत आयपीएलच्या माध्यमातून १४६.६ कोटी रुपये मिळवले आहेत. सध्या तो एका हंगामासाठी १५ कोटी इतकी रक्कम घेतो. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने आत्तापर्यंत सर्वाधिक पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी उंचावली आहे. २०११ आयपीएल हंगामावेळी मुंबई संघात सामील होण्यापूर्वी रोहित डेक्कन चार्जर्स संघाचे प्रतिनिधित्व करत होता.
४) कोलकाता नाइट रायडर्स- पॅट कमिन्स
कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा त्या संघाचा सर्वात महागडा खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा उपकर्णधार असलेल्या कमिन्सला २०२० आयपीएल लिलावावेळी कोलकाता संघ व्यवस्थापनाने १५.५० कोटी रुपये देत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू आहे.
५) राजस्थान रॉयल्स- बेन स्टोक्स
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा राजस्थान रॉयल्सचा सर्वात महागडा खेळाडू आहे. २०१८ आयपीएल लिलावावेळी राजस्थान संघाने १२.५० कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. तेव्हापासून तो राजस्थान संघाचा भाग आहे. स्टोक्सने २०१७ आयपीएल हंगामापासून आयपीएलमध्ये खेळण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी तो रायझिंग पुणे सुपरजायंट संघाचे प्रतिनिधित्व करत.
६) सनरायझर्स हैदराबाद- डेव्हिड वॉर्नर
सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर हा १२.५० कोटी रुपये घेत हैदराबादचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. २०१८ आयपीएल लिलावापूर्वी हैदराबाद संघ व्यवस्थापनाने त्याला संघात कायम केले होते. वॉर्नर हा सनरायझर्स हैदराबाद संघाला विजेतेपद मिळवून देणारा एकमेव कर्णधार आहे.
७) पंजाब किंग्स- केएल राहुल
मोहालीस्थित आयपीएल फ्रेंचायजी असलेल्या पंजाब किंग्स संघाचा सर्वात महागडा खेळाडू केएल राहुल हा आहे. त्याच्यावर २०१८ आयपीएल लिलावावेळी संघ व्यवस्थापनाने ११ कोटी रुपयांची बोली लावली होती. राहुलला २०२० आयपीएलवेळी संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते.
८) रिषभ पंत- दिल्ली कॅपिटल्स
भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्स संघाचा सर्वात महागडा खेळाडू आहे. २०१८ आयपीएल लिलावपूर्वी क्रिस मॉरिस व श्रेयस अय्यरसह पंतला ८ कोटी रुपयांची रक्कम देत दिल्ली संघाने कायम केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ : पंजाबचा नवा लोगो आला रे ! केला ‘हा’ मुख्य बदल
आयपीएल २०२१ : सर्वाधिक रकमेसह लिलावात उतरणाऱ्या पंजाब संघाचे ‘या’ खेळाडूंवर असेल लक्ष
धक्कादायक!! चालू क्रिकेट सामन्यात क्रिकेटपटूचा हार्ट अटॅकने मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना