भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू रुद्र प्रताप सिंह (सिनीयर) यांचा ज्येष्ठ मुलगा हॅरी याची इंग्लंडच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघात निवड झाली आहे. हॅरी आपल्या कुटुंबासह इंग्लंडमध्ये स्थायिक आहे. भारतासाठी दोन वनडे सामने खेळलेले आरपी सिंग भारत व उत्तर प्रदेश साठी खेळल्यानंतर इंग्लंडमध्ये स्थायिक झाले होते.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सिंह म्हणाले,
“हॅरीच्या इंग्लंड संघातील निवडीने मी अत्यंत आनंदी आहे. लंडन येथे नुकत्याच झालेल्या डर्बीविरुद्धच्या एका सामन्यात १५० धावांची खेळी केल्यानंतर त्याला इंग्लंड अंडर १९ संघाकडून बोलावणे आले. या आधी देखील त्याने १३० धावांची खेळी केली होती. तो एक उत्कृष्ट फुटबॉलर देखील आहे.”
अठरा वर्षीय हॅरी हा सलामीवीर म्हणून आपल्या संघासाठी भूमिका पार पाडतो. याव्यतिरिक्त त्याची बहीण अंजली ही देखील इंग्लंडच्या ज्युनियर संघासाठी खेळली आहे. मात्र, कोरोना काळात क्रिकेट सोडून तिने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्याकडे लक्ष दिले. आरपी सिंग हे आपली मुले व पत्नी अमांडा हिच्यासह इंग्लंडमध्ये वास्तव्य करतात. विशेष म्हणजे अमांडाही देखील एक क्रिकेटर आणि टेनिसपटू होत्या. आरपी यांचे बंधू उदय हे देखील लखनऊमध्ये एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून ओळखले जायचे.
आरपी सिंग यांनी उत्तर प्रदेशसाठी एकूण ५९ प्रथमश्रेणी सामने खेळले होते. वेगवान गोलंदाज असलेल्या आरपी यांना भारतीय संघासाठी दोन वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली होती. २४ सप्टेंबर १९८६ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध हैदराबाद येथे त्यांनी पदार्पण केले होते. त्यांना आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत केवळ एक बळी मिळवता आला. यानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये स्थायिक होऊन काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला.
महत्त्वाच्या बातम्या-
तुलिका मानने ज्यूडोमध्ये भारताला मिळवून दिले सिल्वर मेडल, वाचा तिचा कॉमनवेल्थमधील प्रवास
WIvsIND: रोहित-द्रविडच्या डोळ्यात खुपतोयं ‘हा’ खेळाडू, बनला आहे टीम इंडियाची मोठी कमजोरी
रेणुकाच्या अफलातून गोलंदाजीने विरोधी संघाच्या दांड्या गुल! एकाच व्हिडिओमध्ये पाहा विकेट्सचा थरार