भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली मोठ्या काळानंतर संघात पुनरागमन करत आहे. आगामी आशिया चषकासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात विराट कोहली आणि उपकर्णधार केएल राहुल या दोन प्रमुख खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. आशिया चषकाची सुरुवात २७ ऑगस्ट रोजी होणार आहे. सध्या खराब फॉर्ममधून चाललेल्या विराटला चक्क पाकिस्तानच्याच एका माजी दिग्गजाने सल्ला दिला आहे.
यावर्षी खेळला जाणारा आशिया चषक टी२० प्रकारामधील आहे. २७ ऑगस्टपासून ही स्पर्धा सुरू होईल. पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. भारत आपल्या अभियानाची सुरुवात २८ ऑगस्ट रोजी करेल. भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत असणार आहे, ज्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. विराट कोहली देखील पाकिस्तानविरुद्ध चांगले प्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात असेल. याच पार्श्वभूमीवर त्याने सरावाला सुरुवात देखील केली आहे.
कोहली मागील दोन वर्षांपासून शतक झळकावू शकला नाही. तसेच तो सातत्याने मोठ्या धावसंख्या रचण्यात अपयशी ठरला आहे. विराट फॉर्ममध्ये नसल्याने अनेक दिग्गज त्याला काही सल्ले देत आहेत. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेद याने देखील नुकतीच विराटच्या खराब फॉर्मविषयी प्रतिक्रिया दिली. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला,
“रूट, विराट, विल्यमसन यांच्यासारखे तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेले खेळाडू कधी ना कधी अशा वाईट काळातून जातच असतात. मात्र, विराटचा हा काळ बराच लांबला आहे. मला वाटते एव्हाना विराटला त्याची कमजोरी समजून आली असेल. लवकरच तो एखादी मोठी खेळी करून पुन्हा एकदा फॉर्ममध्ये येईल.”
विराटने त्याचा शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध जुलै महिन्यात खेळला होता. त्यानंतर वेस्ट इंडीज दौऱ्यात त्याला विश्रांती दिली गेली होती. आशिया चषकापूर्वी भारताला झिम्बाब्वे दौरा करायचा आहे. पण विराटने झिम्बाब्वे दौऱ्यातून देखील माघार घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एशिया कपमध्ये रोहित ठरणार ‘हिट’मॅन! एकाहून एक बड्या विक्रमांचे रचणार मनोरे
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नियम अधिक कडक! आता खेळाडूंना सोसावा लागणार भुर्दंड
अखेर अफगाणिस्तानच्या हाती यश, आयर्लंडविरुद्ध सलग २ टी२० पराभवांनंतर उघडले खाते