मध्यप्रदेश क्रिकेट असोशियशनचे अजीव सदस्य संजीव गुप्ता यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीविरुद्ध बीसीसीआयकडे तक्रार केली आहे. विराट कोहली भारतीय क्रिकेटशी संबंधित दोन संस्थांशी जोडला गेल्यामुळे परस्पर हितसंबंधांबद्दल (conflict of interest) ही तक्रार करण्यात आली आहे.
बीसीसीआयच्या तथ्य समितीचे प्रमुख डीके जैन यांनी या तक्रारीचा स्विकार केला आहे. “माझ्याकडे विराटबद्दल तक्रार आली आहे. मी यावर अभ्यास करेल. जर असे काही आढळले तर विराटला यावर त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल”, असे जैन यावेळी म्हणाले.
विराट भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असून तो कॉर्नरस्टोन वेंचर पार्टनर्स एलएलपी व विराट कोहली स्पोर्ट्स एलएलपी या कंपन्यांचा डायरेक्टर आहे. याच कंपन्यांचा को डायरेक्टर असलेला बंटी सजदेह हा कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमीटेडचा भाग आहे.
यातील कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमीटेड कंपनी भारतातील अनेक खेळाडूंचे टॅंलेंट मॅनेजमेंट पाहते. टॅलेंट मॅनेजमेंट म्हणजेच त्यांच्या आर्थिक बाजू पाहणे व इतर व्यवस्थापन करणे होय.
केएल राहुल, रिषभ पंत, रविंद्र जडेजा किंवा उमेश यादवसारख्या अनेक क्रिकेटर व इतर खेळाडूंचे टॅलेंट मॅनेजमेंट या कंपनीकडून पाहिले जाते. विराट जरी या कंपनीचा भाग नसला तरी विराटचे कॉर्नरस्टोन वेंचर पार्टनर्स एलएलपीमधील को डायरेक्टर मात्र याचे भाग आहे. तसेच तो भारतीय संघाचाही कर्णधार आहे.
लोढा कमिटीने घालून दिलेल्या नियमांनुसार कोणत्याही खेळाडू अथवा बीसीसीआयशी निगडीत व्यक्तीचे उत्पन्नाचे दोन किंवा अधिक स्त्रोत थोडक्यात परस्पर हितसंबंध (conflict of interest) हे क्रिकेटमधून येणारे नसावे तसेच अशा संस्थांशी निगडीत दोन पदांवर तो व्यक्ती काम करु शकत नाही.
यापुर्वीच याच गुप्तांकडून परस्पर हितसंबंधाबद्दल (conflict of interest) सौरव गांगुली, व्हिव्हिएस लक्ष्मण व कपिल देव यांच्याबद्दल तक्रारी करण्यात आल्या होत्या. याचमुळे सौरव गांगुली, व्हिव्हिएस लक्ष्मण व कपिल देव एका पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
गांगुलीने लोढा कमिटीने आखून दिलेल्या या नियमाबद्दल आधीच नाराजी व्यक्त केली होती. परंतू आता गांगुलीच बीसीसीआयचा अध्यक्ष आहे.
आता जर बीसीसीआयच्या तथ्य समितीपुढे विराटचे परस्पर हितसंबंध (conflict of interest) सिद्ध झाले तर विराटला एकतर आपल्या डायरेक्टर पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो किंवा कर्णधारपदाचा तरी राजीनामा द्यावा लागू शकतो.