क्रिकेटची प्रचंड आवड असणाऱ्या भारतीय चाहत्यांच्या मनात नेहमीच एक इच्छा असते क्रिकेट या खेळाचा समावेश ऑलिम्पिकमध्ये व्हावा, ज्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे एखादे पदक निश्चित होण्याची शक्यता वाढेल. सन १९०० मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत एकदाच क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान, चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे, लवकरच ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा थरार पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
सन २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यावर आयसीसीची नजर आहे. यासाठी २०२४ च्या टी२० विश्वचषकाचे यजमानपद अमेरिकेला देण्याचा विचार सुरू झाला आहे. आयसीसी या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे संयुक्तपणे करू शकते.
एका वृत्तानुसार, ‘आयसीसी स्पर्धेच्या पुढील टप्प्यासाठी ठिकाणांची निवड महत्त्वपूर्ण असेल. यामध्ये त्याचा जगभर प्रसार करण्यावर भर दिला जाणार आहे. जर सर्व काही नियोजनानुसार झाले, तर २०१४ नंतरची ही पहिली जागतिक दर्जाची स्पर्धा असेल ज्याचे आयोजन भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशात होणार नाही.
आयसीसी आपल्या जागतिक दर्जाच्या स्पर्धांचे आयोजनाचे आणि प्रसारण हक्क एखाद्या सहयोगी किंवा उदयोन्मुख देशाला देण्याचा प्रयत्न करत आहे. २०२४ च्या टी२० विश्वचषकात २० संघ सहभागी होऊ शकतील अशी अपेक्षा आहे. म्हणजेच २०२१ च्या तुलनेत या स्पर्धेत सामन्यांची संख्या ५५ पर्यंत वाढेल. आयसीसीला २०२४ ते २०३१ दरम्यान अनेक जागतिक दर्जाच्या स्पर्धा आयोजित करायच्या आहेत आणि त्याची सुरुवात २०२४ च्या टी२० विश्वचषकाने होईल.
तथापि, क्रिकेटला लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात अडचणी येऊ शकतात, कारण सध्या क्रिकेट हा ऑलिम्पिक कार्यक्रमाचा भाग नाही. लॉस एंजेलिस स्थानिक आयोजन समितीला हा अतिरिक्त खेळ म्हणून आणावा लागेल. क्रिकेटसाठी हा एकमेव पर्याय आहे, कारण पॅरिस २०२४ ऑलिम्पिक खेळांसाठी इतर कोणत्याही खेळाचा समावेश केला जाऊ शकत नाही.
लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये खेळांचा समावेश करण्याची प्रक्रिया २०२२ च्या मध्यापासून सुरू होईल. २०२३ च्या मध्यात खेळांचा समावेश करण्याच्या एलओसीच्या प्रस्तावावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती निर्णय घेईल. अमेरिकेतील प्रसिद्ध खेळ असलेल्या बेसबॉल आणि सॉफ्टबॉल या खेळांकडून क्रिकेटला खडतर आव्हान मिळू शकते. ऑलिम्पिकपूर्वी २०२२ मध्ये बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला टी२० क्रिकेटचे आयोजन केले जाईल, ज्यामध्ये ८ संघ सहभागी होतील.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघाबरोबरचा प्रवास संपल्यानंतर आता ‘या’ लीगमध्ये शास्त्री दिसणार आयुक्तांच्या भूमिकेत
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…
‘देशातील क्रिकेट टिकवण्यासाठी आयपीएल आवश्यक’, रवी शास्त्रींचे मोठे भाष्य