पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये मंगळवारी (२१ सप्टेंबर) चुरशीची लढत पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने बाजी मारत पंजाब किंग्स संघावर २ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अनेक अशा घटना घडल्या, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान पंजाब किंग्जच्या फेबिअन एलेनने एक अविश्वसनीय झेल टिपला होता, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाब किंग्स संघाला विजयाच्या अगदी जवळ येऊन पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यादरम्यान पंजाबचा कर्णधार केएल राहुल याने यष्टीमागे अप्रतिम झेल टिपला होता. तर फेबिअन एलेनने देखील सीमा रेषेजवळ असा काही झेल टिपला, जे पाहून समालोचकही चकित झाले होते. तसेच बाद झालेल्या फलंदाजानेही टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले.
तर झाले असे की, राजस्थान रॉयल्स संघाची फलंदाजी सुरू असताना, १२ वे षटक टाकण्यासाठी अर्शदीप सिंग गोलंदाजीला आला होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर अर्शदीपने लियाम लिविंगस्टनला ऑफ कटर चेंडू टाकला जो, त्याने मिड विकेटच्या दिशेने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षण करत असलेल्या फेबियन एलेनने सीमारेषेच्या दिशेने डाईव्ह मारत अप्रतिम झेल टिपला.
अनेकांना असेही वाटले होते की, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला आहे. परंतु तत्पूर्वीच फेबिनय एलनने हवेत सूर मारत अविश्वसनीय झेल घेतला होता. हा झेल टिपल्यानंतर फलंदाज लियाम लिविंगस्टोनने देखील फेबियन एलेनचे कौतुक केले होते.
What a stunner from Fabien Allen, a marvelous catch to dismiss Liam Livingstone. He controlled himself really well there and didn't drop the ball. pic.twitter.com/XvqqOzXHQY
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 21, 2021
राजस्थान रॉयल्स संघाला १८५ धावा करण्यात आले होते यश
या सामन्यात पंजाब किंग्स संघाने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. या आमंत्रणाचा स्वीकार करत, राजस्थान रॉयल्स संघातील सलामीवीर फलंदाजांनी संघाला चांगलीच सुरुवात करून दिली होती. यशस्वी जयस्वालने ताबडतोड ४९ धावांची खेळी खेळी.तसेच महिपाल लोमरोर याने चौफेर फटकेबाजी करत अवघ्या १७ चेंडूंमध्ये ४३ धावांची खेळी केली.तर एविन लुईसने ३६ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाला २० षटक अखेर १८५ धावा करण्यात यश आले होते.
पंजाब किंग्स संघाचा २ धावांनी पराभव
या धावांचा पाठलाग करताना, सलामीवीर फलंदाज केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांनी ताबडतोड सुरुवात करून दिली होती. केएल राहुलने ४९ तर मयंकने ६७ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. शेवटी निकोलस पुरणने देखील ३२ धावांचे योगदान दिले. परंतु पंजाब किंग्स संघाला आव्हानाच्या अगदी जवळ येऊन पराभवाचा सामना करावा लागला. या अटीतटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने २ धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाब विरुद्ध राजस्थान सामना फिक्स होता? पंचांच्या ‘त्या’ चूकीमुळे संतप्त नेटकऱ्यांचे गंभीर आरोप
कर्णधारानेच काढला कर्णधाराचा काटा; हवेत उडी मारत राहुलने एकहाती टिपला सॅमसनचा अवघड झेल
हा कोणता सरपटणारा प्राणी? लाईव्ह सामन्यात निकोलसने केलं असं काही की हसू हसू दुखेल पोट





