दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूंबद्दल चर्चा करायची झाल्यास एबी डिविलियर्स आणि फाफ डू प्लेसिस या खेळाडूंची नावे हमखास घेतली जातात. खरंतर हे दोघेही बालमित्र. एकत्रच क्रिकेट खेळत मोठे झालेल्या या दोन मित्रांनी दक्षिण आफ्रिकेसाठी दमदार कामगिरीही केली. दरम्यान या दोघांसाठीही १७ फेब्रुवारी हा एक खास दिवस झाल्याचे दिसून आले.
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसने १७ फेब्रुवारी २०२१ रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या या निर्णयाचे अनेकांना आश्चर्य वाटले होते. पण त्याने कसोटीतून निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगितले. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत त्याच्या कसोटीतून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले.
मित्रप्रेम की योगायोग…
खास गोष्ट अशी की कसोटीतून निवृत्ती घेण्याच्या बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजेच १७ फेब्रुवारी २०२० रोजी फाफ डू प्लेसिसने दक्षिण आफ्रिका संघाचे तिन्ही क्रिकेट प्रकारातील कर्णधारपद सोडले होते. त्यावेळी त्याने देशाच्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता.
विशेष म्हणजे १७ फेब्रुवारी हा दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू एबी डिविलियर्सचा जन्मदिवस आहे; आणि डिविलियर्स हा फाफ डू प्लेसिसचा लहानपणापासूनचा जवळचा मित्र आहे. त्यामुळे डिविलियर्सच्या वाढदिवसाच्या दिवशीच डू प्लेसिसने घेतेलेले दोन मोठे निर्णय हा मोठा योगायोग जुळून आला आहे. हा केवळ योगायोगच आहे की डू प्लिसिसने दाखवलेले मित्रप्रेम आहे, असा प्रश्न मात्र अनेकांना पडला होता.
डिविलियर्स-डू प्लेसिसची मैत्री
डिविलियर्स आणि डू प्लेसिस हे दोघेही सारख्याच वयाचे खेळाडू. त्यांनी प्राथमिक शिक्षण घेत असताना एकमेकांविरुद्ध क्रिकेट खेळले. पण पुढे माध्यमिक शिक्षणावेळी ते एकाच शाळेत दाखल झाले. त्यामुळे त्यांच्या मैत्री झाली. ते दोघे १९ वर्षांखालील संघातही एकत्र खेळले. त्यानंतर एबी डिविलियर्सला २००४ मध्येच दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. मात्र डू प्लेसिसला २०११ पर्यंत आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी वाट पाहावी लागली. असे असले तरी त्यांच्या मैत्रीत दुरावा आला नाही.
त्यांच्या मैत्रीचा खास किस्सा असा की डू प्लेसिसचा २०१० साली लँकाशायर संघाबरोबरचा कोल्पॅक करार संपला होता. त्यावेळी डू प्लेसिस दुसऱ्यांदा काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी करार करण्याच्या विचारात होता. मात्र, त्यावेळी डिविलियर्सने त्याला असे करण्यापासून थांबवले होते.
एका मुलाखतीत डिविलियर्सने याबाबत खुलासा केला होता. त्याने सांगितले होते की डू प्लिसिसने दुसऱ्यांदा काउंटी क्रिकेटसाठी करार करण्याआधी त्याला फोन केला होता. पण त्यावेळी डिविलियर्सने त्याला सांगितले होते की तो लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करु शकतो, त्यामुळे थोडा धीर धर आणि हा करार करु नको. विशेष म्हणजे काही दिवसांनंतर डू प्लेसिसला २०११ साली भारताविरुद्ध केपटाऊन येथे वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.
विश्वचषक २०१९ दरम्यान मैत्रीवर घोंगावले होते वादळ…
विश्वचषक २०१९ दरम्यान दक्षिण आफ्रिका क्रिकेट अनेक गोष्टींमुळे चर्चेत आले. त्यावेळी एबी डिविलियर्सला विश्वचषकात खेळण्याची इच्छा होती, असे वृत्त समोर आले होते. डिविलियर्सने याबाबत डू प्लेसिसची संवादही साधला होता. ही गोष्ट विश्वचषकात दक्षिण आफ्रिका संघ पहिले तीन सामने पराभूत झाल्यानंतर समोर आली होती. त्यामुळे अनेक चर्चा झाल्या. त्याचदरम्यान डिविलियर्स आणि डू प्लेसिसच्या मैत्रीत फूट पडल्याचीही चर्चा झाली.
मात्र, डू प्लेसिसने नंतर स्पष्ट केले की ते या घटनेनंतरही चांगले मित्र असून अशा घटना मैत्रीपुढे लहान आहेत. त्याचबरोबर एबी डिविलियर्सनेही प्रसिद्धी पत्रक जाहीर करत त्यात म्हटले होते की काही वैयक्तिक गोष्टी ज्याप्रकारे समोर आल्या, त्यात डू प्लेसिसचा हात नव्हता.
आठवणीतील भागीदारी –
डू प्लेसिसने ऑस्ट्रेलिया विरुद्ध २०१२ साली कसोटीत पदार्पण करताना शतकी खेळी साकारली होती. त्याने ऍडलेड येथे २०१२ साली कसोटी पदार्पणाच्या सामन्यात पहिल्या डावात ७८ आणि दुसऱ्या डावात नाबाद ११० धावांची खेळी केली होती. दुसऱ्या डावात त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी सामना वाचवताना एबी डिविलियर्सबरोबर ४०८ चेंडूत ८९ धावांची भागीदारी केली होती. आजही ही भागीदारी अनेकांच्या लक्षात आहे.
यानंतर २०१३ साली भारताविरुद्ध जोहान्सबर्ग येथे खेळताना सामन्याच्या चौथ्या डावात डू प्लेसिस आणि डिविलियर्सने २०५ धावांची भागीदारी रचली होती. त्यावेळी दक्षिण आफ्रिका शेवटच्या डावात ४५८ धावांचा पाठलाग करत होते. विशेष म्हणजे डू प्लेसिस आणि डिविलियर्सच्या द्विशतकी भागीदारीमुळे शेवटचा दिवसाखेरपर्यंत दक्षिण आफ्रिकेने ४५० पर्यंत मजल मारली होती. त्यांना विजयासाठी केवळ ८ धावांची गरज होती आणि हातात ३ विकेट्स बाकी होत्या. मात्र दिवसाचा खेळ संपल्याने हा सामना अनिर्णित राहिला.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२२ मध्ये अशा असू शकतात सर्व १० फ्रँचायझींच्या सलामी जोड्या, पाहा संपूर्ण यादी
कन्फ्यूजनच कन्फ्यूजन! विराटच्या म्हणण्यावर रोहितची रिव्ह्यूसाठी अपील अन् पंचांनी दिला वाईड, नंतर…