आयपीएल २०२०च्या हंगामात रविवारी(४ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्सने किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा १० विकेट्सने पराभव केला. या बरोबरच यंदाच्या हंगामातील दुसरा विजय मिळवला. चेन्नईच्या या विजयात फाफ डु प्लेसिस आणि शेन वॉटसन या सलामीवीरांचा मोठा वाटा राहिला. पंजाबने दिलेल्या १७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना या दोघांनी १८१ धावांनी नाबाद भागीदारी रचली.
या सामन्यानंतर डु प्लेसिसने चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी आणि प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांचे कौतुक केले आहे. त्याने म्हटले आहे की ते आपल्या खेळाडूंवर विश्वास दाखवतात आणि खेळाडूंना पाठिंबा देतात.
मागील काही सामन्यात चेन्नईसाठी शेन वॉटसनसह काही खेळाडूंचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला होता. परंतु तरीही चेन्नई सुपर किंग्सने अंतिम ११ जणांच्या संघात मोठे बदल न करता आपल्या अनुभवी खेळाडूंना पाठिंबा देत त्यांना संघात कायम ठेवले होते. याबद्दलच डु प्लेसिसने धोनी आणि फ्लेमिंगचे कौतुक केले आहे.
डु प्लेसिस सामन्यानंतर म्हणाला, ‘होय, आम्ही चांगली कामगिरी केली. मला वाटते की माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी शेवटपर्यंत टिकून राहिलो. चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यावर मी भर देत आहे. आज रात्री आम्ही चांगली भागीदारी करु शकलो याबद्दल आनंद आहे.’
पुढे डु प्लेसिस म्हणाला, ‘मला वाटते की शेवटच्या सामन्यात आमची गोलंदाजी चांगली होती, आमच्या संघाचे संतुलन चांगले होते पण आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. चांगल्या फलंदाजीने आत्मविश्वास मिळतो. आता आमच्या फलंदाजांना पुरेसा आत्मविश्वास मिळायला हवा. आशा आहे की आमचे खेळाडू येत्या काही सामन्यात फॉर्म मिळवण्यात यशस्वी होतील.’
चेन्नई संघ पंजाब विरुद्ध खेळण्याआधी सलग ३ सामन्यात पराभूत झाला होता. त्यामुळे रविवारच्या विजयाने संघामध्ये पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असेल. रविवारच्या सामन्याआधी झालेल्या ४ सामन्यात चेन्नईचा सलामीवीर वॉटसन केवळ ५२ धावा करु शकला होता. त्यामुळे त्याला संघातून वगळण्याच्या चर्चा होत्या. परंतु पंजाबविरुद्ध त्याने दमदार अर्धशतक करत टीकाकारांना बॅटने उत्तर दिले. वॉटसनने पंजाबविरुद्ध ५३ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ८३ धावा केल्या. तर डु प्लेसिसने ५३ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ८७ धावांची खेळी केली.
वॉटसन सारख्या खेळाडूंवर अपयशानंतरही विश्वास दाखवण्याबद्दल डु प्लेसिस म्हणाला, ‘याचे श्रेय धोनी आणि फ्लेमिंगला जाते. हा सीएसकेचा मार्ग आहे. कदाचित चेन्नई संघ अन्य कोणत्याही संघापेक्षा जास्त आपल्या खेळाडूंना पाठिंबा देतो. ते अशा खेळाडूंना सातत्याने पाठिंबा देतात, जे त्यांना वाटते की अंतिम सामन्यात खेळू शकतील. याचे श्रेय संघव्यवस्थापनाला आहे. हे दिसते तेवढे सोपे नाही.’
चेन्नईचा पुढील सामना अबू धाबी येथे ७ ऑक्टोबरला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणार आहे.