मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात मंगळवारी (१९ एप्रिल) ३१ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडला. डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी येथे झालेल्या या सामन्यात बेंगलोरने १८ धावांनी विजय मिळवला. बेंगलोरच्या विजयात कर्णधार फाफ डू प्लेसिस याने मोलाचा वाटा उचलला. मात्र, तो नव्वदीत बाद झाल्याने त्याचे पहिले आयपीएल शतक थोडक्यात हुकले.
डू प्लेसिस नव्वदीत बाद
या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून बेंगलोरला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. त्यामुळे बेंगलोरकडून अनुज रावत आणि फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) सलामीला फलंदाजीसाठी आले. पण रावत ४ धावा करून बाद झाला. असे असले तरी, डू प्लेसिसने आपला खेळ सुरू ठेवत शतकाकडे वाटचाल केली.
मात्र, बेंगलोरच्या डावाच्या अखेरच्या षटकात जेसन होल्डरने त्याला बाद केले. त्याचा झेल स्टॉयनिसने घेतला. त्यामुळे डू प्लेसिसचे शतक केवळ ४ धावांनी हुकले. तो ६४ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकार मारत ९६ धावा करून बाद झाला. हा डू प्लेसिसचा १०० वा आयपीएल डाव देखील होता.
यापूर्वीही हुकलेय डू प्लेसिसचे शतक
विशेष म्हणजे, डू प्लेसिसने आयपीएलमध्ये ९६ धावांवर बाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही असे झाले आहे. २०१९ साली चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना पंजाब किंग्सविरुद्ध त्याने ९६ धावा केल्या होत्या. त्यावेळीही त्याचे शतक केवळ ४ धावांनी हुकले होते. त्याला सॅम करनने त्रिफळाचीत केले होते.
तसेच नंतर २०२१ हंगामात चेन्नई सुपर किंग्सकडूनच खेळताना त्याने पंजाब किंग्सविरुद्धच नाबाद ९५ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याची आकडेवारी पाहिली, तर लक्षात येते तीन वेळा त्याचे शतक थोडक्यात हुकले आहे. (Faf du Plessis falls four runs short of 100 second time in IPL)
डू प्लेसिसने बेंगलोरला संकटातून काढले बाहेर
या सामन्यात बेंगलोरच्या फलंदाजीची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. रावतची ४ धावांवर विकेट गेल्यानंतर विराट कोहलीही पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद होत माघारी परतला होता. पण, नंतर ग्लेन मॅक्सवेलने डू प्लेसिसची साथ दिली. या दोघांनी ३७ धावांची भागीदारी केली आणि मॅक्सवेल २३ धावांवर माघारी परतला. पण असे असले तरी डू प्लेसिसने एक बाजू सांभाळून ठेवली होती. त्याने शाहबाद अहमदबरोबर ७० धावांची चांगली भागीदारी करत बेंगलोरला १३० धावांचा टप्पा ओलांडून दिला (LSG vs RCB).
नंतर त्याला दिनेश कार्तिकची साथ मिळाली. या दोघांनी बेंगलोरला २० षटकांत १८१ धावांपर्यंत पोहचवण्याच मोलाचा वाटा उचलला. कार्तिकने नाबाद १३ धावा केल्या. लखनऊकडून दुश्मंता चमिरा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या लखनऊकडून कृणाल पंड्याने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. पण नियमित अंतराने फलंदाजांनी विकेट्स गमावल्याने लखनऊला २० षटकांत ८ बाद १६३ धावाच करता आल्या. त्यामुळे बेंगलोरने हा सामना १८ धावांनी जिंकला. बेंगलोरकडून जोस हेजलवूडने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
केएल राहुल विराटला ठरला सरस! ६००० टी२० धावा करत ‘या’ विक्रमात पटकावला अव्वल क्रमांक
जेसन होल्डरने रोखलं मॅक्सवेलचं वादळ, सुपरमॅन बनत हवेत घेतला जबराट कॅच; Video पाहाच