रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा नवीन कर्णधार फाफ डू प्लेसिसने आयपीएल २०२२च्या पहिल्याच सामन्यात वादळी खेळी. आयपीएलच्या १५व्या हंगामातील बेंगलोरचा पहिला सामना पंजाब किंग्सविरुद्ध रविवारी (२७ मार्च) झाला. या सामन्यात पंजाब संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. मात्र, बेंगलोरच्या फलंदाजांनी प्राथमिकरीत्या पंजाबचा हा निर्णय चुकीचा ठरवला. यामध्ये कर्णधार डू प्लेलिसने आपली कर्णधारपदाला साजेशी खेळी केली आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
बेंगलोर संघाकडून फलंदाजी करताना फाफ डू प्लेसिसने (Faf Du Plessis) ५७ चेंडूत सर्वाधिक ८८ धावांची खेळी केली. या धावा करताना त्याने ३ चौकार आणि तब्बल ७ षटकार ठोकले. विशेष म्हणजे, सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या डू प्लेसिसने सुरुवातीला सावकाश फलंदाजी केली. एकेवेळी १० षटके होऊनही डू प्लेसिस ३० चेंडू खेळत १७ धावांवर खेळत होता. मात्र, त्यानंतर त्याने जो वेग पकडला, तो पाहण्यासारखा होता. त्याच्या फलंदाजीतून नुसता धावांचा पाऊस पडला. त्याने १७.१ षटकापर्यंत ५७ चेंडू खेळताना ८८ धावा ठोकल्या.
आयपीएलमध्ये पंजाब किंग्सविरुद्ध फाफ डू प्लेसिसची कामगिरी
फाफ डू प्लेसिसने आयपीएलमध्ये पंजाब किंग्स संघाचा अनेकदा सामना केला आहे. यामध्ये जास्त करून त्याच्या वाट्याला यशच आले. फक्त एक वेळा तो शून्य धावेवर तंबूत परतला. त्याच्या पंजाबविरुद्धच्या एकूण डावांबद्दल बोलायचं झालं, तर त्याने यापूर्वी पंजाबविरुद्ध २९, ५२, ०, ५५, ६७, १४, ५४, ९६, ८७*, ४८, ३६*, ७६ आणि ६४ अशा धावा केल्या आहेत.
सर्वात कमी डावात आयपीएलमध्ये ३००० धावाही केल्या पूर्ण
आयपीएलमध्ये डू प्लेसिसने सर्वात कमी डावांमध्ये ३००० धावा पूर्ण करण्याचाही पराक्रम गाजवला आहे. त्याने ९४ डावांमध्ये ३००० धावांचा टप्पा पार केला आहे. या यादीत तो सुरेश रैनासह संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी आहे. याव्यतिरिक्त वेगवान ३००० धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने अवघ्या ७५ डावांमध्ये हा कारनामा केला आहे. दुसऱ्या क्रमांकावर केएल राहुल असून त्याने ८० डावांमध्ये वेगवान ३००० धावा केल्या आहेत. या यादीत चौथ्या क्रमांकावर ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना असून त्याने १०३ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.
बेंगलोरकडून पंजाबविरुद्ध आयपीएलमध्ये दुसऱ्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी
१३६ धाव – ख्रिस गेल आणि विराट कोहली (२०१३)
११९ धावा – ख्रिस गेल आणि विराट कोहली (२०१२)
११८ धावा – फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली (२०२२*)
१११ धावा – ख्रिस गेल आणि विराट कोहली (२०११)
८५ धावा – एबी डिविलियर्स आणि विराट कोहली (२०१९)
महत्वाची बाब म्हणजे आरसीबीकडून या विक्रमाच्या यादीत पहिल्या पाचही भागीदारीत विराट कोहलीचा समावेश आहे.
अधिक वाचा –
नाद नाद नादच! आता रोहित अन् धोनीसह ‘या’ यादीत विराटचेही घेतले जाणार नाव; पाहा काय केलाय कारनामा
अर्रर्र! मागील १० हंगामांपासून मुंबई इंडियन्स ‘या’ गोष्टीत ठरतोय फ्लॉप; वाचून तुम्हालाही बसेल शॉक