मुंबई । भारताचा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजीच्या शैलीमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. आपल्या अचूक ‘यॉर्कर’ने विरोधी संघातील फलंदाजांच्या नाकात दम अाणणारा बुमराह भारतीय संघाचे प्रमुख अस्त्र आहे. अनेक आजी- माजी गोलंदाज त्याचे कौतुक करताना थकत नाहीत.
नुकतेच दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि खेळाडू फाफ डू प्लेसिस याने एका लाईव्ह कार्यक्रमात बुमराहचे कौतुक केले आहे. या कार्यक्रमात त्याने बुमराह आणि जोफ्रा आर्चर यांच्या गोलंदाजीमध्ये नेमकी समानता काय आहे यावर भाष्य केले आहे.
24 वर्षीय बुमराहने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध आपले कसोटी पदार्पण केले होते. त्याने आपल्या पहिल्याच कसोटी मालिकेत 14 विकेट घेत साऱ्यांनाच आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले होते.
सोनी टेन स्पोर्ट्सच्या पिटस्टॉप या कार्यक्रमात बोलताना डू प्लेसीस म्हणाला, “2018 साली तो आमच्या विरुद्ध खेळताना पदार्पण करेल असे वाटले नव्हते. अखेर त्याला त्या कसोटी मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. त्याची ‘रिस्ट व्हेरिएशन’ खूप चांगली आहे. अगदी जोफ्रा आर्चर सारखी. खरोखरच तो उत्तम गोलंदाज आहे.”
2018 साली दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात झालेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बुमराहने दमदार कामगिरी केली होती. तरीही भारताला या कसोटी मालिकेत 2-1 अशा फरकाने पराभवास सामोरे जावे लागले. केपटाऊन आणि सेंच्युरिअन येथे झालेल्या पहिल्या दोन कसोटीत दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली. त्यानंतर जोहान्सबर्ग येथे झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात विराटसेनेने 63 धावांनी विजय मिळवला. वनडे मालिकेत भारताने दमदार कमबॅक करत आफ्रिकेला 5-1 अशा फरकाने हरवत मालिका जिंकली.
तो म्हणाला, “या मालिकेत आम्ही भारताचा पराभव केला. भारताने देखील चांगली टक्कर दिली. दोन्ही संघात खूपच चांगली मालिका झाली. त्यावेळी भारताने पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांचा यशस्वीपणे सामना केला होता.”
बुमराहने 2018 साली आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर भारतीय संघाकडून खेळताना त्याने सातत्याने ‘मॅचविनिंग परफॉर्मन्स’ दिला आहे. खूप कमी कालावधीत त्याने जागतिक क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून एक धाक निर्माण केला आहे.
सध्याच्या घडीला भारतीय संघाकडे इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार यांसारख्या एकापेक्षा एक अतिउत्तम वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे. भारतीय गोलंदाजीमध्ये वैविध्यपूर्ण असल्याने अनेक आजी- माजी खेळाडू भारतीय गोलंदाजीचे कौतुक करत असतात.
ट्रेंडिंग घडामोडी-
-बंगाल टायगर सौरव गांगुलीने पाहिले होते भूत; फायर ब्रिगेड वाल्यांना बोलवले होते घरी
-इंग्लंडचा कर्णधार जो रुटला कन्यारत्न; इंस्टाग्रामवर फोटो केला शेअर
-अतिशय देखण्या बायका असलेले ५ फ्लॉप भारतीय क्रिकेटर्स