सध्या जगभारत टी-२० क्रिकेटचा बोलबाला आहे. जगभरातील वाढत्या टी-२० क्रिकेट लीगचा प्रभाव पाहून दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज फाफ डु प्लेसिस याने एक आश्चर्यकारक विधान केले आहे. फाफ डु प्लेसीसला असा विश्वास आहे की, वेगाने वाढणारी टी-२० लीग आगामी काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी मोठा धोका बनू शकते.
आयपीएलचा चौदावा हंगाम कोरोनामुळे स्थगित करण्यात आला होता. यापूर्वी फाफ डु प्लेसिसने चेन्नई सुपर किंग्जसाठी शानदार प्रदर्शन केले होते. आता तो पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) सहाव्या हंगामासाठी यूएईमध्ये आहे.
पीएसएलची फ्रँचायझी पेशावर झाल्मीकडून खेळणार्या फाफ डु प्लेसिसला असा विश्वास आहे की, आगामी काळात फ्रँचायझी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील संतुलन समान राहण्याची गरज नाही. इतकेच नाही तर फाफ डु प्लेसिसला असा विश्वास आहे की जसजशी वेळ जाईल तसतसेही टी-२० लीग आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा अधिक मजबूत आणि प्रभावी होत जाईल, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी धोकादायक ठरेल.
आंतराष्ट्रीय क्रिकेटसाठी अडचण बनेल टी-२० लीग
तो म्हणाला, “टी-२० लीग आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी मोठा धोका आहे. हे अगदी स्पष्ट आहे की, लीगची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. एक काळ असा होता की, जगभरात फक्त २ लीग असायच्या. पण आज आपण त्याकडे पाहिले तर दरवर्षी याच वाढ होत आहे. माझ्यामते भविष्याबद्दल विचार केला तर, टी-२० लीग आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट या दोन्ही संघटनांचे अस्तित्व कसे एकत्र ठेवता येईल? याचा विचार केला पाहिजे. कारण टी-२० लीग आणि आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवडीची बाब बनली तर हा मुद्दा खरोखर आंतराष्ट्रीय क्रिकेटसाठी मोठा धोका ठरू शकतो आहे.”
१० वर्षानंतर फुटबॉलसारखे होतील हाल
इतकेच नाही तर फाफ डु प्लेसिस याचा असा विश्वास आहे की, जर असेच चालू राहिले तर येत्या १० वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे स्वरूपही फुटबॉलसारखेच होईल. जिथे आंतरराष्ट्रीय सामन्यांपेक्षा फुटबॉल लीगमध्ये संघ जास्त खेळताना दिसून येतात.
तो म्हणाला, “हे एक मोठे आव्हान असणार आहे आणि मला असे वाटते की येत्या दहा वर्षांत क्रिकेटचे स्वरूपही फुटबॉलसारखे होईल. जिथे आपणास फक्त जागतिक स्पर्धेदरम्यान राष्ट्रीय संघाकडून खेळाडू खेळताना दिसतात. अन्यवेळी ते खेळाडू फुटबॉल लिगमधेच खेळताना दिसतात आणि कोणताही खेळाडू जगात कुठेही खेळू शकतो. जर मी माझ्याबद्दल बोललो तर, माझ्यासारखा कोणताही खेळाडू दोन, तीन किंवा चार टी-२० लीगमध्ये खेळत असेल तर तो त्याच्या भविष्याबद्दल काही सांगू शकत नाही. माझ्यासारखे आणखी बरेच खेळाडू आहेत, ज्यांना टी -20 लीगमध्ये खेळणे थांबवायचे नाही.”
वेस्ट इंडीजनंतर दक्षिण आफ्रिकेही करणार टी-२० लीगच्या दुष्परिणामांचा सामना
फाफ डु प्लेसिसने वेस्ट इंडीज संघाबद्दल बोलताना सांगितले की, “कॅरेबियन संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला संघ आहे ज्याने आपल्या सर्व खेळाडूंना टी-२० लीगमध्ये जाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे त्यांना अनेक खेळाडू गमवावे लागले. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाला बरेच आंतरराष्ट्रीय सामने गमवावे लागले आहेत. मला वाटते की लवकरच हे दक्षिण आफ्रिकेच्या संघातही दिसून येईल ”
महत्वाच्या बातम्या
अनुष्का शर्मासह मिसेस डिविलियर्सनी केला खास फोटो पोस्ट, दिली ‘अशी’ कॅप्शन
कलम ३७० चा भारतीय वाहिन्यांना बसणार आर्थिक फटका? क्रिकेट प्रक्षेपणासाठी भारतीय कंपन्यांना दिला नकार
दुखापतीमुळे गेले २ महिने क्रिकेटपासून दूर असलेला बेन स्टोक्स ‘या’ स्पर्धेतून करणार मैदानात पुनरागमन





