दिनांक १५ मे, २०२२च्या सकाळी सकाळी क्रिकेटप्रेमींना धक्का देणारी एक बातमी समोर आली. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज ऑलराऊंडर ऍण्ड्रू सायमंड्स यांचे अपघातात निधन झाल्याची ही बातमी होती. वयाच्या अवघ्या ४६व्या वर्षी त्याला या जगाचा निरोप घ्यावा लागला. आपल्या संपूर्ण क्रिकेट करियरमध्ये नेहमीच वादग्रस्त राहिलेला, तरीही अनेकांच्या आवडीचा असलेला सायमंड्स अशाप्रकारे लवकर एक्झिट घेईल असे कोणालाही वाटले नव्हते. अपघातात जीव गमवावा लागलेला सायमंड्स हा पहिलाच क्रिकेटर नाही. यापूर्वी अनेक क्रिकेटपटूंना अशा दुर्दैवी मृत्यूला सामोरे जावे लागले होते. सायमंड्सप्रमाणे अपघातात निधन पावलेल्या अशाच क्रिकेटर्सविषयी आपण जाणून घेणार आहोत.
कोली स्मिथ
अपघातात निधन पावलेल्या क्रिकेटच्या यादीमध्ये सर्वात पहिले नाव येते वेस्ट इंडीजच्या कोली स्मिथ यांचे. ६०च्या दशकात सर गॅरी सोबर्स यांच्यासोबत स्मिथ वेस्ट इंडिज संघातील एक प्रमुख खेळाडू मानले जायचे. १९५९ मध्ये एक चॅरिटी मॅच खेळण्यासाठी चाललेल्या सोबर्स, स्मिथ आणि टॉम ड्युडनी यांच्या कारला पहाटे अपघात होऊन, कार गुरांच्या वाहनाला धडकली होती. सोबर्स ड्रायव्हिंग करत असताना डोळ्यावर अचानक लाइट चमकल्याने हा अपघात घडलेला. यामध्ये सोबर्स व ड्युडनी बचावले. मात्र, मागच्या सीटवर बसलेल्या स्मिथ यांना आपला जीव गमवावा लागला. विशेष म्हणजे स्मिथ यांना १९५८ चा विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले. असं म्हणतात स्मिथ यांच्या अंत्यसंस्कारासाठी किंग्सटन येथे तब्बल ६० हजार लोकांची गर्दी झालेली.
हेही पाहा- अपघातात जीव गमवावा लागलेले जगातील ५ महान क्रिकेटर
मंजूरल इस्माम राणा
आजही कसोटी क्रिकेट खेळलेला आणि सर्वात कमी वयात निधन झालेला क्रिकेटर म्हणजे बांगलादेशचा मंजूरल इस्लाम राणा होय. त्याने बांगलादेशसाठी ६ टेस्ट आणि २२ वनडे खेळलेल्या. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्याचे निधन झाले. आपला मित्र आणि संघसहकारी सज्जाद हसन याच्यासोबत तो एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला चालला असताना त्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला होता. त्यांची बाईक एका मायक्रो बसला धडकली. या अपघातात ते दोघेही क्रिकेटर मृत्यू पावले. २००७ मध्ये त्याचा मृत्यू झाला तेव्हा बांगलादेश क्रिकेट संघ वेस्ट इंडीजमध्ये वर्ल्डकप खेळत होता. त्यानंतर बांगलादेश संघाने आपल्या पहिल्या मॅचमध्ये बलाढ्य भारतीय संघाला पराभूत करण्याची किमया केली. बांगलादेशचा कर्णधार हाबिबुल बशर याने तो विजय, राणा याला अर्पण करत संपूर्ण ग्राउंडमध्ये त्याचा फोटो घेऊन फेरी मारली होती.
बेन हॉलिओक
इंग्लिश क्रिकेटर बेन हॉलिओक यालाही कार अपघातात आपले प्राण गमवावे लागले होते. केवळ १९ व्या वर्षी त्याने इंग्लंडकडून डेब्यू केलेला. अवघ्या २४ व्या वर्षी त्याच्या कारचा अपघात झाला. ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये कार चालवत असताना, त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार भिंतीला धडकली होती. त्या अपघातात बेन याचा जागीच मृत्यू झाला होता तर, त्याच्या सोबत असलेली त्याची गर्लफ्रेंड तीन महिने कोमात होती. ही घटना २३ मार्च २००२ रोजी घडलेली. इंग्लंडसाठी २२ इंटरनॅशनल मॅच खेळलेला बेन असा आकस्मित निधन पावेल, असा कोणी विचारही केला नव्हता.
नजीब तारकाई
अपघातात निधन पावलेल्या क्रिकेटर्सपैकी एक म्हणजे अफगाणिस्तानचा नजीब तारकाई. नजीब अफगाणिस्तानसाठी तेरा इंटरनॅशनल मॅच खेळलेल्या नजीबच्या कारला २ ऑक्टोबर २०२० रोजी जलालाबाद येथे अपघात झाला होता. असे असताना त्याने चार दिवस मृत्यूशी झुंज दिली. मात्र, त्याची ही झुंज अपयशी ठरली. मृत्युसमयी त्याचे वय अवघे २९ वर्ष होते.
रूनाको मॉरटन
वेस्ट इंडिजचा क्रिकेटर रूनाको मॉरटन अनेकांना आठवत असेल. मॉरटन असा क्रिकेटर होता जो मोठे फटके जितक्या ताकदीने खेळायचा, तितक्याच सफाईदारपणे एकेरी दुहेरी रन्स काढायचा. वेस्ट इंडीजसाठी जवळपास आठ वर्ष खेळलेला मॉरटन वयाच्या अवघ्या ३३व्या वर्षी जग सोडून गेला. एक डोमेस्टिक फर्स्ट क्लास मॅच खेळून येत असताना त्याच्या गाडीचा अपघात झाला आणि तो जागीच गतप्राण झाला. त्याची गाडी त्रिनिदादमधीस सोलमॉन हायवेवरील एका पोलवर धडकली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काही कळायच्या आत डॅनीने करिष्माला उचलून घेतले, अन् ‘ते’ कांड झाले, जाणून घ्याच
टीम इंडियाच्या नावावर असणारे लाजिरवाणे विक्रम; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘नको रे बाबा!’