क्रीडाविश्वातून मन सुन्न करणारी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचा प्रसिद्ध बॉडीबिल्डर आशिष साखरकर याचे निधन झाले आहे. आशिषने बुधवारी (दि. 19 जुलै) आजारपणामुळे जगाचा निरोप घेतल्याचे बोलले जात आहे. त्याच्या निधनामुळे बॉडीबिल्डिंग क्षेत्राचे कधीही न भरू शकणारे मोठे नुकसान झाले आहे. मराठमोळ्या आशिषने बॉडीबिल्डिंग क्षेत्रात अनेक किताबांना गवसणी घातली होती. त्यामध्ये मिस्टर युनिव्हर्स, मिस्टर इंडिया आणि मिस्टर महाराष्ट्र या किताबांचा समावेश आहे.
बॉडीबिल्डिंग क्षेत्रामध्ये आशिष साखरकर (Ashish Sakharkar) हे मोठे नाव होतं. आशिषने फक्त महाराष्ट्रातच नाही, तर त्याची छाप जगभरात पाडली. त्याने ‘मिस्टर महाराष्ट्र’ किताबापासून ते ‘मिस्टर इंडिया’ आणि ‘मिस्टर युनिव्हर्स’ यांसारखे किताबांवरही आपले नाव कोरले आहे.
काय होती आशिषची शेवटची पोस्ट?
आशिष इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय असायचा. तो त्याचे बॉडीबिल्डिंगचे फोटो आणि व्हिडिओही शेअर करत होता. त्याला इंस्टाग्रामवर 61 हजारांहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. त्याची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट सध्या सर्वात चर्चेत आहे. चाहते आणि युजर्स त्याच्या शेवटच्या पोस्टवर त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. ही पोस्ट त्याने 2011मध्ये मुंबई येथे ‘मिस्टर युनिव्हर्स’ हा पुरस्कार पटकावल्या संबंधित आहे. हा दिवस त्याने आयुष्यातील सर्वात संस्मरणीय असल्याचे कॅप्शनमध्ये लिहिले होते. यामध्ये त्याने कांस्य पदकाची कमाई केली होती.
https://www.instagram.com/p/CrdduaINDyN/
एका युजरने कमेंट करत लिहिले की, “भावपूर्ण श्रद्धांजली दादा.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “भावपूर्ण श्रद्धांजली दादा. मी आजवर फिटनेस इंडस्ट्रीत भेटलेलो सर्वात मातीशी नाळ जोडलेला व्यक्ती.” आणखी एकाने कमेंट करत असे लिहिले की, “एक मराठमोळा मावळा…तुझ्या कारकिर्दीला मानाचा मुजरा…भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.” अशाप्रकारे चाहते त्याच्या शेवटच्या पोस्टवर कमेंट करत आहेत.
आशिषने पटकावलेले किताब
4 वेळा- मिस्टर इंडिया किताब
4 वेळा- फेडरेशन कप किताब
रौप्य आणि कांस्य पदक- मिस्टर युनिव्हर्स किताब
रौप्य पदक- मिस्टर आशिया
युरोपियन चॅम्पियनशिप
शिव छत्रपती पुरस्कार
महत्त्वाच्या बातम्या-
‘जगाला सांगून टाक, मी येतोय’, व्हिडिओ शेअर करत बूम बूम बुमराहची मोठी घोषणा!
नव्या दमाच्या यशस्वीला ‘दादा’चा फुल सपोर्ट; विश्वचषकाविषयी म्हणाला, ‘मला त्याला…’