नव्या दमाच्या यशस्वीला ‘दादा’चा फुल सपोर्ट; विश्वचषकाविषयी म्हणाला, ‘मला त्याला…’

भारतीय संघात अनेक खेळाडू आहेत, ज्यांना क्रिकेटप्रेमी आणि माजी दिग्गज आगामी आयसीसी वनडे विश्वचषक 2023मध्ये खेळताना पाहू इच्छितात. या क्रिकेटपटूंमध्ये यशस्वी जयसवाल आघाडीवर आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यशस्वी जयसवाल याला आगामी विश्वचषकात खेळताना पाहू इच्छितो. जयसवालने काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात 171 धावांची खेळी साकारून सर्वांनाच प्रभावित केले होते. त्याच्या पहिल्याच शतकानंतर जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. आता गांगुलीने त्याच्याविषयी मोठे भाष्य केले आहे.
काय म्हणाला गांगुली?
सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने माध्यमांशी बोलताना म्हटले की, “मी यशस्वी जयसवाल याला वनडे विश्वचषकात खेळताना पाहू इच्छितो. मी नेहमीच वरच्या फळीत डाव्या-उजव्या संयोजनाच्या (Left-Right Combination) बाजूने आहे. यामुळे विरोधी गोलंदाजही दबावात असतात.”
सन 1996मध्ये लॉर्ड्स मैदानावर आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात शतक ठोकणारा गांगुली म्हणाला की, “जयसवाल भारताकडून वनडे विश्वचषक संघात असायला पाहिजे. मी आगामी वनडे विश्वचषकात जयसवालला खेळताना पाहू इच्छितो.”
‘पुढे जाण्याची आवड आणि कौशल्य’
गांगुलीचा असा विश्वास आहे की, या युवा खेळाडूमध्ये पुढे जाण्याची धमक आणि कौशल्य आहे. तो म्हणाला, “मी आयपीएलदरम्यान त्याला जवळून पाहिले आहे. मात्र, कसोटी क्रिकेट वेगळे आहे आणि त्याने दाखवून दिले आहे की, त्याच्यात तिथेही यशस्वी होण्याची क्षमता आहे. मला वाटते की, त्याच्यात दीर्घ काळ भारतीय क्रिकेटची सेवा करण्याची क्षमता आहे.”
पुढे बोलताना गांगुली असेही म्हणाला की, “मी नेहमीच वरच्या फळीत डाव्या-उजव्या संयोजनाच्या बाजूने राहिलो आहे. यामुळे विरोधी संघ चिंतेत पडतो. कारण, गोलंदाजांना सातत्याने लाईन आणि लेंथ फलंदाजांच्या हिशोबाने बदलावी लागते.”
यशस्वी शानदार फॉर्ममध्ये
यशस्वी जयसवाल देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून खेळतो. मागील काही हंगामात त्याने संघासाठी धावांचा पाऊस पाडला आहे. यावर्षी आयपीएल 2023 हंगामात यशस्वीने राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघासाठी शानदार खेळी साकारल्या आहेत. त्याने राजस्थानकडून 14 सामने खेळताना 625 धावांचा पाऊस पाडला होता. हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने पाचवे स्थान पटकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘अश्विन देशाचा महान…’, भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाकडून दिग्गजाचे खास कौतुक
जबरदस्त! सहाव्याच कसोटीत पाकिस्तानच्या नव्या फलंदाजाने रचला इतिहास, एकट्यानेच केला ‘हा’ रेकॉर्ड