शनिवारी केपटाऊन येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्या दरम्यान चेंडू छेडछाडीचा धक्कादायक प्रकार घडला. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी केलेल्या या लाजिरवाण्या प्रकारामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आता आणखी एक नवीन खुलासा झाला आहे. तो असा की दक्षिण आफ्रिकेचे माजी वेगवान गोलंदाज फॅनी डीविलियर्स यांनी आधीच कॅमेरामनला ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर लक्ष ठेवण्यास बजावले होते.
त्यांनी RSN Radio ला सांगताना याबद्दल खुलासा केला. त्यांनी सांगितले की “जर २६, २७ आणि २८ व्या षटकात ऑस्ट्रेलियाला चेंडू टाकताना रिव्हर्स स्विंग मिळत असेल तर ते साधारणपणे सगळे जे करतात त्यापेक्षा काहीतरी वेगळे करत होते.”
“आम्ही आमच्या कॅमेरामनला सांगितले की ‘जा आणि खेळाडूंवर लक्ष ठेवा. ते कशाचातरी वापर करत आहेत.’ त्यानंतर त्यांनी दीडतास शोध घेतला आणि त्यानंतर त्यांनी बॅनक्रोफ्टवर लक्ष ठेवणे सुरु केले. अखेर तो रंगेहात पकडला गेला.”
तसेच ते पुढे म्हणाले, ” खेळपट्टीवर गवत असताना चेंडू इतका खराब होणे शक्य नाही. ही खेळपट्टी पाकिस्तानसारखी नव्हती, जिथे तुम्हाला प्रत्येक सेंटिमीटरवर तडे गेलेले दिसतील.”
त्याचबरोबर त्यांनी सांगितले की ऑस्ट्रेलियाला जो पर्यंत चेंडू खराब होणार नाही तोपर्यंत सुरवातीला रिव्हर्स स्विंग मिळणे शक्य नव्हते. तसेच ते म्हणाले की ऑस्ट्रेलियाला ३० आधीच रिव्हर्स स्विंग मला होता. जर क्रिकेटचा चेंडू लोखंड किंवा स्टीलला घासला तर तो लगेचच रिव्हर्स स्विंग व्हायला लागतो.
या चेंडू छेडछाड प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना कर्णधार आणि उपकर्णधार पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. तसेच स्मिथ आणि सलामीवीर फलंदाज कॅमेरॉन बॅनक्रोफ्टवर आयसीसीने कारवाई देखील केली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन या प्रकरणानंतर राजीनामा देखील देणार आहेत.