भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी भारतातील एक अतिशय लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. चाहते त्याला भेटण्यासाठी आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी नेहमीच आतुर असतात. धोनीने मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र अजूनही त्याची लोकप्रियता कायम आहे. याचा नुकताच प्रत्यय आला.
बुधवारी (३ मार्च) राजस्थानमध्ये अशीच एक घटना घडली. राजस्थानमध्ये एका शाळेच्या उद्घाटनासाठी एमएस धोनी पोहोचला होता. यावेळी त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती. या गर्दीवर ताबा मिळवण्यासाठी अखेर पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला.
एमएस धोनी राजस्थानमधील जालौर जिल्ह्यातील सांचोर येथे एका कार्यक्रमासाठी गेला होता. या कार्यक्रमात त्याच्या हस्ते एका शाळेचे उद्घाटन होणार होते. या कार्यक्रमासाठी तो राजस्थान-गुजरात सीमेवरील नैनवा जिल्ह्यात पोहोचला असता त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांनतर पुढे धोनी कार्यक्रमस्थळी रवाना झाला.
धोनी सदर कार्यक्रमासाठी येत असल्याची खबर वाऱ्याच्या वेगाने पसरली. त्यांनतर त्याची झलक पाहायला मिळावी यासाठी चाहत्यांनी गर्दी करायला सुरुवात केली. धोनी ज्यावेळी कार्यक्रमस्थळी पोहोचला त्यावेळी तिथे चाहत्यांची गर्दी आटोक्याबाहेर गेली होती. गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्याने चाहत्यांमध्ये धक्काबुक्की देखील सुरु झाली. अखेर या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर परिस्थिती काबूत आणण्यात यश आले.
दरम्यान, या कार्यक्रमासाठी धोनी व्यतिरिक्त राजस्थानचे पर्यावरण मंत्री सुखराम बिश्नोई आणि संसद सदस्य देवजी पटेल देखील उपस्थित होते. या गर्दीला नियंत्रणात आणल्यानंतर कार्यक्रम सुरळीत पार पडल्याचे वृत्त आहे. तसेच या कार्यक्रमानंतर धोनी थेट चेन्नईसाठी रवाना झाला. आयपीएलच्या चौदाव्या हंगामात तो आता चेन्नई सुपर किंग्जच्या संघाकडून सहभागी होणार असून त्यांच्या सरावाला ११ मार्च पासून सुरुवात होईल.
महत्वाच्या बातम्या:
INDvsENG 4th Test Live: अर्धशतकानंतर बेन स्टोक्स तंबूत, चहापानापर्यंत इंग्लंडच्या ५ बाद १४४ धावा
व्हिडिओ: मोहम्मद सिराजची जबरा गोलंदाजी, चेंडू कळायच्या आधीच इंग्लिश कर्णधार पायचित
ब्रेकिंग! पाकिस्तान सुपर लीगला कोरोनाचा फटका; उर्वरित हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित